आघाडीसाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न
By Admin | Updated: September 4, 2014 00:22 IST2014-09-04T00:18:10+5:302014-09-04T00:22:39+5:30
कॉँग्रेसचा प्रतिसाद नाही : जि. प. पदाधिकारी निवड

आघाडीसाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न
कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसने एकत्रित यावे, यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये शेवटच्या टप्प्यांत असाच प्रयोग होऊन राष्ट्रवादीने मित्रपक्षांना सोडून कॉँग्रेसला बरोबर घेतले होते. यावेळी कॉँग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घेणार का? हे महत्त्वाचे आहे.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बांधकाम सभापतिपद देत सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस फारच बॅकफूटवर गेली. त्यांचे अवघे सोळा सदस्य निवडून आल्याने त्यांनी सत्ता स्थापन्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. आता नवीन आरक्षणानुसार अध्यक्ष निवड २१ सप्टेंबरला होत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापतिपदांसाठी कॉँग्रेस सदस्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादीचे सदस्य जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.
जिल्हा परिषदेतील आघाडीसाठी दोन्ही कॉँग्रेसमध्ये जिल्हा पातळीवर एकमत होईल, असे वाटत नाही; पण प्रदेश पातळीवरून सूचना आल्या तर आघाडीचा विचार होऊ शकतो. त्यासाठीही शेवटच्या टप्प्यांत प्रयत्न होऊ शकतात. (प्रतिनिधी)