‘शिस्ती’त होणार राष्ट्रवादीचा ‘निर्धार’
By Admin | Updated: July 14, 2014 00:59 IST2014-07-14T00:55:18+5:302014-07-14T00:59:35+5:30
पुष्पगुच्छ नव्हे तोंडीच स्वागत : नवीन प्रदेशाध्यक्षांचे फर्मान

‘शिस्ती’त होणार राष्ट्रवादीचा ‘निर्धार’
राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निर्धार मेळाव्यासाठी विशिष्ट नियमावली बनविली आहे. नेत्यांचे स्वागत, फ्लेक्स (बॅनर) चे डिझाईनपासून व्यासपीठावर बसायचे कोणी, याचे फर्मानच प्रदेशाध्यक्षांनी काढले आहे. या शिस्तीच्या फर्मानाने कार्यकर्त्यांना मात्र उत्साहाला मुरड घालावी लागणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आक्रमक झाली असून, जिल्हानिहाय निर्धार मेळावे घेण्यात येणार आहे. राज्यात नंबर वन होण्यासाठी मतदारसंघनिहाय बांधणी सुरू आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. मेळावा म्हटले की, नेत्यांचे जंगी स्वागत, स्वागतासाठी भला मोठा पुष्पहार, फटाक्यांची आतषबाजी, सभास्थळी छबी झळकण्यासाठी कार्यकर्त्यांची डिजिटलच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा, व्यासपीठावरील डिजिटलवरीलही नेत्यांची भाऊगर्दी उसळते. तालुकाध्यक्षांपासून जिल्हा कार्यकारिणी सदस्य, प्रांतिक सदस्य, जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री, संपर्कमंत्री यानंतर प्रमुख पाहुण्यांचे भाषण होते. पण, या गोष्टींना तटकरे यांनी फाटा द्यायचे ठरविले आहे.
ज्यासाठी आपण येणार आहे, तो उद्देश साध्य होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मेळाव्यासाठी स्टेजमागील प्लेक्सचे डिझाईन प्रदेश कार्यालयाकडून देण्यात येणार आहे. त्यावर पालकमंत्री, संपर्क मंत्रीशिवाय इतर कोणाचेही फोटो असणार नाहीत. स्टेजवर मोजक्याच खुर्च्यां असतील. प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री यांचे स्वागत तोंडी अथवा एक पुष्पगुच्छ देऊन करायचे आहे. मोठे हार, फुलांचे गुच्छ, शाली पूर्ण बंद. प्रदेश राष्ट्रवादीने तयार केलेल्या गीतांचा वापर मेळाव्यापूर्वी होईल.
प्रदेशाध्यक्षांच्या आचारसंहितेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उत्साहाला मुरड घालावी लागेल. कार्यकर्त्यांचे म्हणणेच ऐकून घेणार नसाल, तर मेळावा कसला, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. नवीन अध्यक्ष, नवीन नियमावली, असे समजावण्याचा प्रयत्न नेते करत आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जिल्हाध्यक्षांनी समजून घ्यायच्या व त्यांनीच त्या मेळाव्यात मांडण्याचे आदेशही प्रदेशाध्यक्षांनी दिले आहेत.