NCP is wrestling against the alliance - campaign for spreading the fort of 'Nationalist' | Lok Sabha Election 2019 युतीकडून ‘राष्ट्रवादी’चा गड भेदण्यासाठीच प्रचार-: युतीविरुद्ध राष्ट्रवादी अशीच कुस्ती
Lok Sabha Election 2019 युतीकडून ‘राष्ट्रवादी’चा गड भेदण्यासाठीच प्रचार-: युतीविरुद्ध राष्ट्रवादी अशीच कुस्ती

ठळक मुद्देदक्षिण महाराष्ट्रात काटाजोड लढती

विश्वास पाटील ।
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत दक्षिण महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीपुढे राष्ट्रवादी काँग्रेसचेच तगडे आव्हान आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच जास्त आक्रमक असल्याने त्याच पक्षाच्या गंडस्थळावर हल्ला करण्याचा युतीचा प्रयत्न आहे. रविवारी (दि. २४) झालेल्या युतीच्या प्रचारसभेत त्याचेच प्रत्यंतर पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर झेप घेईल, असा दावा त्या पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे.

दक्षिण महाराष्ट्रात युतीविरुद्ध राष्ट्रवादी असाच थेट सामना आहे. डॉ. सुजय विखे, रणजितसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह निंबाळकर, आदी नेत्यांना भाजपने पक्षात घेऊन राष्ट्रवादीला आव्हान द्यायचा प्रयत्न केला असला, तरी या प्रदेशावरील राष्ट्रवादीची पकड त्यामुळे ढिली झाली असे आताच म्हणणे धाडसाचेच ठरेल. त्या पक्षाचे नेते शरद पवार हे मुत्सद्दी राजकारणी असल्याने त्यांनाच टार्गेट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. महसूलमंत्री व कोल्हापूरचे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तर सातत्याने पवार यांच्यावर टीकेचा भडिमार करीत आहेत. रविवारी झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अजेंड्यावर राष्ट्रवादीच राहिला.

काँग्रेस आघाडीचे राज्यात सध्या सहाच खासदार आहेत. त्यातील चार राष्ट्रवादीचे. तेदेखील पश्चिम महाराष्ट्रातीलच आहेत. त्यातील कोल्हापूरच्या जागेबद्दल सध्या चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना पक्षांतर्गत अडचणी निर्माण झाल्या आहेत. हातकणंगलेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना पळायला लागले तरी त्यांचा अजूनही दबदबा आहे. साताऱ्यात उदयनराजे यांना सुरुवातीला एकतर्फी वाटणारी लढत नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारीमुळे चुरशीची बनली आहे. माढ्याकडे साºया राज्याचे लक्ष आहे. तिथे राष्ट्रवादीने भाजपच्या मदतीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनलेल्या संजय शिंदे यांनाच मैदानात उतरवून भाजपवर प्रतिहल्ला केला आहे.

बारामती हा राष्ट्रवादीचा गड आहे. तिथे सुप्रिया सुळे यांना कांचन कुल यांनी आव्हान दिले आहे. शिरुरला खासदार आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्यात काटाजोड लढत होत आहे. आढळरावांना तिथे काही प्रमाणात अ‍ॅन्टीइकम्बसीचा सामना करावा लागत आहे. मावळला पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याशी मुकाबला आहे. तिथे त्यांची पप्पू पवार अशी अवहेलना शिवसेनेकडून सुरू असली, तरीतिथेही राज्यातील लक्षवेधी लढत अपेक्षित आहे. पवार घराण्याची प्रतिष्ठा या जागेशी जोडली गेली आहे.

काँग्रेस सांगली, सोलापूर आणि पुण्यातून लढत आहे. त्यातील सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. सांगलीचा जागेचा वाद, प्रतीक पाटील यांची बंडखोरी यामुळे काँग्रेस तिथे कासावीस झाली आहे. पुण्यातूनही भाजपच्या गिरीश बापट यांना आव्हान देऊ शकेल, असा उमेदवार शोधताना घाम फुटला आहे. अरविंद शिंदे या तरुण कार्यकर्त्याचे नाव तेथून चर्चेत आहे.


पश्चिम महाराष्ट्र सध्याचे बलाबल
एकूण जागा : १०
राष्ट्रवादी : ०४
भाजप : ०३
शिवसेना : ०२
स्वाभिमानी संघटना : ०१
काँग्रेस : ००
आता कोण किती मतदारसंघात रिंगणात
राष्ट्रवादी : ०७ (०१ स्वाभिमानी घटक पक्ष)
भाजप : ०५
शिवसेना : ०५
काँग्रेस : ०३ (०१ संभाव्य स्वाभिमानी घटक पक्ष)

राज्यात राष्ट्रवादीला १२ पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास आहे; त्यामुळे निकालानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांना मानसिक धक्का बसू नये, अशी माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. इंडिया शायनिंगच्यावेळीही भाजपने असेच अंदाज व्यक्त केले होते, तेव्हा लोकांनी निकालानंतर त्यांचे शायनिंग उतरविले होते.
- आमदार हसन मुश्रीफ,
प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


Web Title: NCP is wrestling against the alliance - campaign for spreading the fort of 'Nationalist'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.