राष्ट्रवादी, शेकाप, शिवसेना आणि रिपाइं यांची आघाडी
By Admin | Updated: February 10, 2017 00:25 IST2017-02-10T00:25:27+5:302017-02-10T00:25:27+5:30
राधानगरी-करवीर तालुका : काँग्रेसला डोकेदुखी होणार

राष्ट्रवादी, शेकाप, शिवसेना आणि रिपाइं यांची आघाडी
भोगावती : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी राधानगरी-करवीर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन गवई गट यांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या आघाडीने चांगलीची ताकद निर्माण झाली आहे. नव्याने निर्माण झालेल्या या आघाडीने मतदारसंघात चांगलीच रंगत निर्माण होणार आहे. ज्या ज्या जागांवर आघाडी करण्यात आली आहे, तेथे काँग्रेस हाच प्रमुख विरोधी पक्ष असल्यामुळे काँग्रेसला डोकेदुखी होणार आहे.
राष्ट्रवादी, शेकापक्ष, शिवसेना आणि आरपीआय यांच्या आघाडीत राधानगरी तालुक्यातील राशिवडे-करवीर तालुक्यातील परिते, सडोली खालसा, सांगरुळ आणि बोरवडे (कागल) या ठिकाणच्या मतदारसंघाविषयी चर्चा जवळपास निश्चित झाली आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघातील काही जि.प. आणि काही पंचायत समिती मतदारसंघाचे आघाडीअंतर्गत वर्गीकरण करून जागा वाटप केले जाणार आहे.
आघाडीअंतर्गत झालेल्या प्राथमिक चर्चेत राशिवडे जिल्हा परिषद व धामोड पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस, राशिवडे पंचायत समिती शेकाप, करवीर तालुक्यात परिते जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस, परिते पंचायत समिती शेकापक्ष, वाशी पं. स. शिवसेना (आमदार नरके गट), सडोली खालसा जि.प. व पं. स. शेकापक्ष, सांगरुळ जि. प. रिपब्लिकन पक्षास (गवई गट) देण्याबाबतची चर्चा झाली आहे, तर हसूर पं समितीची जागा शेकापक्ष व शिवसेना यांच्यात ठरवली जाणार आहे. कागल तालुक्यातील बोरवडे व करवीर तालुक्यातील उजळाईवाडी व दिंडनेर्ली येथे राष्ट्रवादी व आरपीआय यांच्यात आज अंतिम निर्णय होईल.
आघाडीच्या निर्णयावर या मतदारसंघात प्रमुख विरोधी काँग्रेस अडचणीत येऊ शकतो. यावर आता काँग्रेस कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाचे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनादेखील स्वतंत्र लढत आहे. यामुळे येथील लढती रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. (वार्ताहर)