नवी मुंबई पोलिसांची कोल्हापुरात कारवाई; तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST2021-01-08T05:15:26+5:302021-01-08T05:15:26+5:30

कोल्हापूर : मुंबई महानगरपालिकेत तसेच इतर शासकीय सेवेत नोकरी लावतो म्हणून पैसे घेऊन पाच तरुणांना सुमारे २० लाखांचा गंडा ...

Navi Mumbai police action in Kolhapur; Three arrested | नवी मुंबई पोलिसांची कोल्हापुरात कारवाई; तिघांना अटक

नवी मुंबई पोलिसांची कोल्हापुरात कारवाई; तिघांना अटक

कोल्हापूर : मुंबई महानगरपालिकेत तसेच इतर शासकीय सेवेत नोकरी लावतो म्हणून पैसे घेऊन पाच तरुणांना सुमारे २० लाखांचा गंडा घातल्याच्या संशयावरुन नवी मुंबई पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चौघांना अटक केली. कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांना कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सहकार्य केले.

अटक केलेल्या संशयितांची नावे : संजय दिनकर गाडेकर (रा. बिरदेव वसाहत, कागल), भिकाजी हरी भोसले (कलंकवाडी, ता. राधानगरी), नामदेव रामचंद्र पाटील (वेतवडे, ता. पन्हाळा), जयसिंग शंकर पवार-पाटील (रा. शिरोली दुमाला, ता. करवीर).

मुंबई महानगरपालिकेत अगर इतर शासकीय कार्यालयांत नोकरी लावतो, असे सांगून बेरोजगार युवकांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना नोकरी न लावता त्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा नवी मुंबई पोलिसांत दाखल झाला आहे. त्याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार मुंबईतील काही युवकांना यापूर्वीच अटक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांच्या साखळीमध्ये कोल्हापुरातील काही युवकांचा सहभाग असल्याची माहितीही पोलीस तपासात पुढे आली. त्यानुसार शनिवारी नवी मुंबई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, सहायक पोलीस निरीक्षक समीर चास्कर हे पोलीस पथकासह कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांची भेट घेऊन गुन्ह्याबाबत माहिती दिली. त्यानुसार त्यांच्या सहकार्याने पोलिसांनी चौघा संशयितांना त्यांच्या घरातून अटक केली. चौघांनाही नवी मुंबईतील न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पो. नि. तानाजी सावंत यांनी दिली.

पैसे घेऊन दिली बनावट नियुक्तीपत्रे

अटक केलेल्या संशयितांच्या टोळीने युवकांकडून लाखो रुपये उकळून त्यांना नियुक्तीची बनावट प्रमाणपत्रे दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Navi Mumbai police action in Kolhapur; Three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.