पर्यावरण रक्षणासाठी ‘निसर्ग मित्र’ सज्ज

By Admin | Updated: March 20, 2016 23:26 IST2016-03-20T23:19:13+5:302016-03-20T23:26:29+5:30

निसर्ग’शेतीकडे वाटचाल! : १९८२पासून विविध क्षेत्रांत कार्यरत; जागृतीसाठी निसर्ग प्रशिक्षण शिबिर - लोकमतसंगे जाणून घेऊ

'Natural Friends' Ready for Environmental Protection | पर्यावरण रक्षणासाठी ‘निसर्ग मित्र’ सज्ज

पर्यावरण रक्षणासाठी ‘निसर्ग मित्र’ सज्ज

गणेश शिंदे --कोल्हापूर --भविष्यात शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी सौरदिवा, सौर वाळवण यंत्र, सौरचूल, सौर चार्जर यासारखी उपकरणे तयार करणे, कडधान्य संवर्धन वर्षानिमित्त पाककृती स्पर्धा व महोत्सव व कडधान्यांचे विविध प्रकार, आरोग्यदायी महत्त्व, लागवड याविषयी पोस्टर प्रदर्शन भरविणार आहे. त्याचबरोबर यावर्षी पावसाळ्यात रानभाज्या विक्री व्यवस्था महिला मंडळातर्फे ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर सुरू करण्याचा ‘निसर्ग मित्र’ कोल्हापूर या संस्थेचा भविष्यातील मानस आहे. यावरून सर्वांनी शेतीकडे वळावे, असा संदेश ‘निसर्ग मित्र’ या संस्थेने याद्वारे दिला आहे.
पक्षी निरीक्षणासाठी १९८२ ला कोल्हापुरातील निसर्गप्रेमी मंडळी एकत्र आली. त्यातील काहीजण नागपूरला पक्षिमित्र संमेलनातही सहभागी झाले होते. या मंडळींनी निसर्गविषयक जागृती करण्याच्या उद्देशाने ८ एप्रिल १९८२ रोजी ‘निसर्ग मित्र’ या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या संस्थापक सभासदांमध्ये डॉ. सुभाष आठले, सुरेश शिपूरकर, डॉ. जय सामंत, वसंतराव शिरगावकर, डॉ. पुष्पा बेर्डे, वनस्पतीतज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन, डॉ. विजय करंडे, आदम मुजावर, शेखर पडळकर अशी अनेक पर्यावरणप्रेमी मंडळी होती.
ही संस्था कोल्हापूर महापालिकेची वृक्षाप्राधिकरण समिती, जिल्हा प्रशासनाची ‘आपत्ती व्यवस्थापन समिती’, महाराष्ट्र शासनाची शालेय पातळीवरील हरित सेना, कोल्हापूर जिल्हा ‘बांबू मिशन’, कोल्हापूर जिल्हा व महापालिकेच्या स्वच्छता अभियान, आदी उपक्रमांत सदस्य म्हणून कार्यरत आहे. तसेच वनविभागाच्या सल्लागार समिती व जैवविविधता समितीवरही सदस्य आहे. फ्लोरा आॅफ सागरेश्वर वाईल्ड लाईफ सॅन्चुरी, ओळख रानभाज्यांची या पुस्तकांचे प्रकाशन निसर्ग मित्र संस्थेमार्फत करण्यात आले आहे. पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करणारी ही संस्था विविध क्षेत्रांत कार्यरत आहे.


जिल्ह्यातील पाच लाखजण ‘विनाआधार’
ग्रामपंचायतीकडेही आता जबाबदारी : २७ फिरती केंदे्र कार्यरत; मोफत नोंदणी
भीमगोंडा देसाई ल्ल कोल्हापूर
जिल्ह्यात अद्याप पाच लाख ११ हजार ९३४ जणांकडे ‘आधार’ ओळखपत्र नाही. त्यांच्यासाठी आता ग्रामपंचायत विभागातर्फे फिरते केंद्र सुरू केले आहे. सध्या जिल्ह्यात २७ फिरती केंद्रे कार्यरत आहेत. याशिवाय महसूल यंत्रणेच्या केंद्रांतही नोंदणी सुरू आहे. आधारसाठी आॅनलाईन नोंदणी मोफत आहे; परंतु, अनेक ठिकाणी खंडणीप्रमाणे मनमानी पैसे उकळले जात आहेत. ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील केंद्रांत पैसे घेतल्याची तक्रार आल्यास संबंधित आॅपरेटरचा नोंदणी परवाना रद्द करण्याचा लेखी इशारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) एम. एस. घुले यांनी दिला आहे.
आठवड्यापूर्वी केंद्र शासनाचा अर्थसंकल्प सादर झाला. त्यामध्ये ‘आधार’ला वैधानिक दर्जा देणार असल्याचे जाहीर केले. यामुळे आधार कार्ड नसलेल्या लोकांचा हे कार्ड काढण्याकडे कल वाढतो आहे. सर्वच शासकीय विभागांतील अनुदान, अन्य लाभ वितरणावेळी आधार कार्ड विचारले जात आहे. प्रेमळ सक्ती केली जात आहे. परिणामी, ‘आधार’ची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. बोगस पटसंख्या शोधण्यासाठी अंगणवाडी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडेही आधार असावे, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. गॅस अनुदान थेट बँकेत जमा होणे, शिष्यवृत्ती यांसह सर्वच शासकीय कामांसाठी गेल्यानंतर पहिल्यांदा आधार काडर हवे, असे सांगितले जाते. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशात सक्ती नसल्याचे एखाद्याने निदर्शनास आणून दिल्यास रहिवासाच्या अन्य कागदपत्रांची मागणी केली जाते.
‘आधार’ काढल्याने काहीही तोटा नाही; पण केंदे्र कमी असल्याने आधारसाठी आॅनलाईन नोंदणी करणाऱ्या केंद्रचालकांकडून अक्षरश: लूट सुरू आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी ‘आधार कार्ड काढून मिळेल,’ अशी जाहिरात करीत केंद्रचालकांनी दुकानदारी मांडली आहे. पैसे घेणाऱ्या केंद्रचालकांवर कारवाईची व्यापक मोहीम राबविण्याकडे महसूल यंत्रणेने दुर्लक्ष केले. परिणामी, पैसे घेण्याची प्रवृत्ती फोफावली. रांगेत तासन्तास थांबायचे, मागेल तेवढे पैसे द्यायचे याला कंटाळून अनेकांनी ‘आधार कार्ड’ अजूनही काढले नाही.
‘आधार’साठी नोंदणीची प्रक्रिया मोफत, सुलभ व्हावी, यासाठी ग्रामपंचायत विभागाने नियोजन केले आहे. पूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतीतील संग्राम कक्षातील संगणक परिचालकांच्या मदतीने फिरते आधार केंद्र सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात सर्वाधिक आधार कार्ड काढावयाच्या गावांत केंद्र सुरू आहे.

Web Title: 'Natural Friends' Ready for Environmental Protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.