राष्ट्रवादी सत्ताधाऱ्यांबरोबरच !
By Admin | Updated: April 8, 2015 00:44 IST2015-04-08T00:43:14+5:302015-04-08T00:44:39+5:30
‘गोकुळ’ निवडणूक : जिल्हा बँकेचे राजकारण ‘सेफ’ करणार

राष्ट्रवादी सत्ताधाऱ्यांबरोबरच !
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सत्तारुढ पॅनेलमध्ये रणजित पाटील व अरुण डोंगळे यांची उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कोट्यातून दिली आहे. त्यामुळे त्याहून वेगळा वाटा तुमच्या पक्षाला दिला जाणार नसल्याचे सत्तारुढ आघाडीचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांनी सोमवारीच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे स्पष्ट केल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादी ‘गोकुळ’मध्ये काँग्रेसला ‘बाय’ देऊन जिल्हा बँक आपल्या ताब्यात कशी राहील, असे बेरजेचे राजकारण करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची आगामी पाच वर्षांची दिशा काय राहणार हे आज, बुधवारी होणाऱ्या गोकुळव जिल्हा बँकेच्या घडामोडींतून स्पष्ट होणार आहे. ‘गोकुळ’ची दोन्ही पॅनेल आज जाहीर होणार आहेत. त्याचवेळी जिल्हा बँकेसाठी अर्ज भरण्याची अखेरची मुदतही आजच आहे. ‘गोकुळ’मध्ये राष्ट्रवादी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना पाठिंबा देऊन स्वतंत्र पॅनेल करणार काय, हीच लोकांत सर्वाधिक उत्सुकता आहे परंतु मंगळवारी सायंकाळपर्यंतच्या घडामोडी तरी राष्ट्रवादीने ‘तलवार म्यान’ केल्याच्याच होत्या. राष्ट्रवादीने सत्तारुढ काँग्रेसच्या विरोधात पॅनेल करावेच, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी त्यास मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील या दोन नेत्यांचीच तयारी नाही.
मुश्रीफ यांना विधानसभेला ‘गोकुळ’चे संचालक रणजित पाटील यांची मोठी मदत झाली. तशीच मदत के. पी. पाटील यांना राधानगरी मतदारसंघातून गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांच्याकडून झाली. त्यावेळीच गोकुळच्या पॅनेलमध्ये तुमच्या दोघांसाठी राष्ट्रवादी मदत करेल, अशी चर्चा मुश्रीफ-केपी व महाडिक यांच्यात झाल्याचे समजते. त्यामुळे या दोन जागा सोडून राष्ट्रवादीसाठी पॅनेलमध्ये स्वतंत्र जागा देण्यास सत्तारुढ गट तयार नाही. तसे राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही स्पष्ट केले असून त्यास ते राजी झाले असल्याचे सत्तारुढ आघाडीचे नेते मंगळवारी छातीठोकपणे सांगत होते. कार्यकर्त्यांचा फारच आग्रह झाल्याने मी तुम्हांला भेटायला आलो असल्याचे मुश्रीफ यांनीही सोमवारच्या बैठकीत स्पष्ट केल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही ‘गोकुळ’च्या सत्तेपेक्षा जिल्हा बँकेच्या राजकारणात जास्त रस आहे. ‘गोकुळ’मध्ये राष्ट्रवादी विरोधात गेल्यास जिल्हा बँकेत या दोन पक्षांतच लढत होऊ शकते. जिल्हा बँक खड्ड्यात घालण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच कारणीभूत असल्याची टीका काँग्रेस सुरुवातीपासून करत आली आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अडचणीत आहे. त्यामुळे गोकुळमध्ये या पक्षाचे नेते महाडिक - पी.एन. यांना दुखावण्याच्या मन:स्थितीत नाहीत.
माघारीसाठी नियम
गोकुळमध्ये अर्ज दाखल केलेल्या उमेदवारास तो अर्ज माघार घ्यावयाचा झाल्यास त्याने स्वत: किंवा सूचक प्राधिकृत केल्यास त्याला माघार घेता येवू शकेल अशी कायदेशीर तरतूद असल्याची माहिती निवडणूक अधिकारी अशोक पाटील यांनी स्पष्ट केले.
चित्र आज स्पष्ट होणार
कुणाचे काय तर...
गोकुळ व केडीसीसीमध्ये दोन्ही काँग्रेस एकमेकांविरोधात लढल्या तरच स्वाभिमानी संघटनेसह
शेकाप, जनता दल आदी अन्य पक्षांना महत्त्व व सत्तेत वाटा मिळू शकतो. या दोन पक्षांत ‘मांडवली’ झाल्यास अन्य पक्षांना कुठेच संधी मिळू शकत नाही. त्यामुळे हे दोन पक्ष काय करणार याबद्दल लोकांइतकीच या पक्षांनाही उत्सुकता होती.
राष्ट्रवादी हवीच
गोकुळमध्ये सत्तारु ढ गटाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस हवीच असा आग्रह मंगळवारी सायंकाळी विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह अरुण नरके, अरुण डोंगळे, रणजित पाटील, रवींद्र आपटे, विश्वास नारायण पाटील व खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे धरला. त्यासाठी त्यांनी राजाराम कारखान्यांवर जाऊन त्यांची भेट घेतली.
पॅनेलची घोषणा ११.३० ला
सत्तारुढ पॅनेलची घोषणा आमदार महाडिक व पी.एन.पाटील हे सकाळी साडेअकरा वाजता ताराबाई पार्कातील सर विश्वेश्वरैया हॉलमध्ये करणार आहेत. माघारीची मुदत दुपारी तीनपर्यंत आहे. परंतु त्या प्रक्रियेस पुरेसा अवधी मिळावा व कुणाचे अर्ज राहू नयेत यासाठी सकाळीच पॅनेलची घोषणा केली जाणार आहे.