इचलकरंजी : केवळ मी भाषण करून पक्ष वाढणार नाही. त्यासाठी मजबूत संघटन आणि सभासद नोंदणी वाढविणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे व्हायला पाहिजेत. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्या. त्याचबरोबर इचलकरंजीचा पाणी, शास्ती, जीएसटी याबाबतचे जे प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. सुरुवातीला पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. पवार म्हणाले, जे आले, ते खरे तर आपल्या विचाराचेच आहेत. लोकशाहीत जनतेचा कौल मान्य करून पुढे जायचे असते. सध्या सरकार जनहिताची अनेक कामे करत असल्याने जनता सरकारसोबत आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून सभासद नोंदणी वाढवावी. नवीन आलेल्यांना योग्य तो मानसन्मान दिला जाईल. तसेच जुन्यांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल. लाडकी बहीण योजना ५ वर्षे सुरू राहणार आहे. त्यासाठी थोडी ओढाताण होत आहे; पण आम्ही नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने ३०-४० महिलांचे गट एकत्र करून त्यांना काही लघुउद्योग उभारण्यासाठी मदत करता येईल का, हे पाहावे, असे सांगून लाडक्या बहिणीच्या हप्त्यातून मिळणाऱ्या रकमेचा हिशेब घातला.वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अजित पवार यांचा दौरा अचानक ठरला असल्याने सध्या काही मोजक्याच मंडळींनी प्रवेश केला आहे. जिल्ह्यातील अनेक नेते राष्टवादीच्या वाट्यावर आहेत. लवकरच जिल्ह्याच्या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेऊन त्यांचाही प्रवेश घेतला जाईल.मेळाव्यास माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, विठ्ठल चोपडे, अमित गाताडे, श्रीकांत कांबळे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जांभळे गटाचा प्रवेशराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख समर्थक तथा माजी आमदार अशोक जांभळे यांनी मुलगा सुहास जांभळे, लतीफ गैबान, परवेज गैबान, कबनूर ग्रा.पं. सदस्य सैफ मुजावर, आदींना घेऊन अजित पवार गटात प्रवेश केला. त्याचबरोबर शरदचंद्र पवार गटातील युवती तालुकाध्यक्ष श्वेता पाटील (चंदूर), उद्योजक सचिन माने यांनीही प्रवेश केला.सुळकूड योजना व्यवहार्य नाही : मुश्रीफइचलकरंजी शहराला पाणी देण्यासाठी सुळकूड योजनेचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने सुळकूड योजना व्यवहार्य नाही, असा अहवाल दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठक झाली असून म्हैशाळ, रेंदाळ खणीत पाणी साठवून उचलणे, अशा विविध पर्यायांची माहिती घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.