National Voters' Day: 28,000 more voters in celebration year, e-epic system implemented | राष्ट्रीय मतदार दिन : वर्षात २८ हजार मतदार वाढले, ई ईपीक प्रणाली कार्यान्वित

राष्ट्रीय मतदार दिन : वर्षात २८ हजार मतदार वाढले, ई ईपीक प्रणाली कार्यान्वित

ठळक मुद्देवर्षात २८ हजार मतदार वाढलेई ईपीक प्रणाली कार्यान्वित : राष्ट्रीय मतदार दिन साजरा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सव्वा वर्षात २८ हजार ८६३ इतके मतदार वाढले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांची आकडेवारी ३० लाख ९३ हजार ४३ इतकी होती. वर्षभरात ही संख्या ३१ लाख २१ हजार ९०६ इतकी झाली आहे. यात १६ लाख ५३८ पुरुष तर १५ लाख २१ हजार २९० महिला आहेत.

निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून ई ईपीक प्रणाली कार्यान्वित केली आहे. याअंतर्गत मतदार यादीत मतदारांच्या नावापुढे त्यांचा मोबाइल नंबर असल्यास त्यांना ई-मतदार ओळखपत्र मोबाइलवर डाऊनलोड करता येईल व ते मतदानासाठी ग्राह्य धरले जाईल.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावून नवभारत घडविण्यासाठी मतदारांनी मतदानास पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी लोकसभा, विधानसभा, पदवीधरच्या निवडणुका असोत किंवा ग्रामपंचायत सर्वच निवडणुकांमध्ये मतदानात कोल्हापूर अग्रेसर असल्याचे गौरवोद्‌गार काढले.

यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे-भांबरे, शाहीर आझाद नायकवडी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी व नवमतदार उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना शपथ दिली.

डॉ. बलकवडे यांनी लोकशाहीने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे, असे आवाहन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी प्रास्ताविक केले. दिव्यांग मतदार, नवमतदारांना मतदान ओळखपत्र मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ब्रेल लिपी, निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. निवडणूक साक्षरतेमध्ये उल्‍लेखनीय काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

--

Web Title: National Voters' Day: 28,000 more voters in celebration year, e-epic system implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.