जिल्ह्यात खेळांचे राष्ट्रीय प्रशिक्षण
By Admin | Updated: December 15, 2014 23:56 IST2014-12-15T23:44:51+5:302014-12-15T23:56:46+5:30
सहा खेळांचा समावेश : राज्यभरातील नामांकित खेळाडूंची रेलचेल

जिल्ह्यात खेळांचे राष्ट्रीय प्रशिक्षण
सांगली : जिल्ह्यात एकाचवेळी सहा विविध खेळांचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण सुरू आहे़ जिल्हा क्रीडा संकुलमध्ये ही शिबिरे सुरू असून राज्यभरातील नामांकित खेळाडूंची सांगलीत रेलचेल आहे़
राजीव गांधी खेल अभियानांतर्गत होणाऱ्या राष्ट्रीय महिला क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे विविध खेळांचे संघ सहभागी होणार आहेत़ पहिल्या सत्रात सांगलीतील क्रीडा संकुलात हॅण्डबॉल, हॉकी व लॉन टेनिस खेळांचे शिबिर पार पडले़ या तिन्ही संघांनी चित्रदुर्ग (कर्नाटक) येथे झालेल्या महिला राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले़
दुसऱ्या सत्रात सांगलीच्या क्रीडा संकुलात अॅथलेटिक, बॅडमिंटन व टेबल टेनिस खेळांची शिबिरे सुरू आहेत़ अॅथलेटिक प्रशिक्षक
रूपाली झेंडे (रत्नागिरी), टेबल
टेनिस प्रशिक्षक सचिन पुरी (हिंगोली) व बॅडमिंटन प्रशिक्षक कलीमुद्दीन (नांदेड) हे खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत़
शिबिराचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्या हस्ते झाले़ यावेळी शंकर भास्करे, सुधाकर जमादार, सुनील कोळी, महेश पाटील, अश्विनी दुकानदार, मंदाकिनी पवार, सुरेश मोटे, दीपक सावंत, श्याम जाधव, गजानन कदम उपस्थित होते़ (क्रीडा प्रतिनिधी)
अनवाणी धावणारी रणरागिणी़़़
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरची वैशाली शिंदे व यवतमाळ जिल्ह्यातील पुसदची सुनीता रसाळ या दोघींची महाराष्ट्र अॅथलेटिक संघात निवड झाली आहे़ सराव शिबिरासाठी त्या सांगलीत दाखल झाल्या़ बिकट आर्थिक परिस्थितीतून सावरत या दोघींनी इथंवर मजल मारली़ धावताना या दोघींच्या पायात शूज नव्हते़ त्या अनवाणीच धावत होत्या, हे पाहून जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी मानवतेच्या भावनेतून या दोघींना नवीन शूज घेऊन दिले़
सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलमध्ये राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ झाला़ यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, शंकर भास्करे, सुधाकर जमादार, सुनील कोळी, महेश पाटील, अश्विनी दुकानदार, मंदाकिनी पवार, दीपक सावंत उपस्थित होते़