आवास योजनेतील लाभार्थ्यांची नावे वगळली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST2021-02-05T07:03:28+5:302021-02-05T07:03:28+5:30
जयसिंगपूर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातून ज्या लाभार्थ्यांनी बांधकामे सुरू केली नाहीत, अशा लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात ...

आवास योजनेतील लाभार्थ्यांची नावे वगळली जाणार
जयसिंगपूर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातून ज्या लाभार्थ्यांनी बांधकामे सुरू केली नाहीत, अशा लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत. शिरोळ व जयसिंगपूर नगरपालिका हद्दीतील अशा लाभार्थ्यांची नावे वगळण्याचा प्रस्ताव १ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल बांधण्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाते. त्या आनुषंगाने शिरोळ व जयसिंगपूर हद्दीमधील प्रस्तावानुसार लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सन २०१७-१८ या वर्षात घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम सुरू केले नसल्याने पहिल्या टप्प्यात त्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यातूनही काही लोकांनी प्रतिसाद दिलेला नाही.
नगरपालिकेच्या संचलनालय कार्यालयाकडून नव्याने आदेश पालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सन २०१८-१९ अखेर मंजूर असलेल्या पण काम सुरू करण्यास इच्छुक नसलेल्या लाभार्थ्यांना ३१ जानेवारीपर्यंत बांधकाम सुरू करण्याबाबतची नोटीस देण्यात यावी. मार्गदर्शक तत्त्वानुसार बांधकाम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांची नावे मंजूर यादीत वगळण्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठवावा, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी बांधकाम सुरू करावे व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.