नागपंचमी विशेष: दिसला साप की ठेचा डोकं, असं कशाला?
By संदीप आडनाईक | Updated: July 29, 2025 13:59 IST2025-07-29T13:56:00+5:302025-07-29T13:59:16+5:30
हा आरोग्याचा सण आहे, हे जाणून घेतले पाहिजे.

नागपंचमी विशेष: दिसला साप की ठेचा डोकं, असं कशाला?
संदीप आडनाईक
कोल्हापूर : समाजात साप या सरपटणाऱ्या वन्यप्राण्याविषयी अनेक गैरसमजुती आहेत. बिनविषारी सापांना विषारी समजून मारले जाणे, साप डूख धरतो अशा अंधश्रद्धांमुळे किडकं, लांबडं, जनावर असे संबोधून समोर साप दिसला की घ्या काठी अन् ठेचा डोकं या मानसिकतेमुळे शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या सापाकडे शत्रू म्हणून पाहिले जात आहे; पण नागपंचमीनिमित्ताने गोडधोड केले जाते, त्यामुळे हा आरोग्याचा सण आहे, हे जाणून घेतले पाहिजे.
नागपंचमीला सर्वांचे विशेषत: महिलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चांगल्या प्रथा आहेत, त्याचे पालन केले पाहिजे. या दिवशी लाह्यांचा नैवेद्य दिला जातो. घरात कोणताही पदार्थ चिरणे, भाजणे, कापणे आणि तळणे वर्ज्य असते, जमीन खणत नाहीत. कोकणात गोमाटीच्या वेलीचीही पूजा केली जाते. गोमाटी, राजीगरा यांसारख्या रानभाज्यांचे पदार्थ केले जातात.
चंदगड भागात दिवाळीसारखा फराळ केला जातो. यामागे आरोग्य जपण्याचा हेतू आहे. शिवाय साप हे शीतरक्ताचे सजीव आहेत, त्यामुळे त्यांना स्वतःच्या शरीराचे तापमान स्वतः नियंत्रित करता येत नाही. तो मांसाहारी सजीव आहे. त्यामुळे तो दूध पीत नाही.
कुंभार समाजाचा पुढाकार
नागपंचमीचे महत्त्व व पूर्वपरंपरा आजही ग्रामीण भागात मोठी आहे. कुंभार समाज पारंपरिक पद्धतीने पाच व सातफड्यांचे मातीचे नाग पूजेसाठी उत्तमरीत्या बनवीत असतात. परंतु, वास्तवात असे नाग नसतात, याची जनजागृती निसर्गमित्र संस्थेने सात वर्षांपासून केली. त्यांना पटवून दिल्यामुळे आता एक फड्याचे मातीचे नाग कुंभार समाज विक्रीसाठी ठेवत आहे. शाहूपुरीतील मंगल पुरेकर यांनी या नागपंचमीनिमित्त तब्बल १००० मातीचे एकफड्याचे नाग तयार केले आणि ते विकले जात आहेत.
चंदगड भागात नागपंचमीला भाजलेले पदार्थ केले जातात. कापणे, चिरणे, जाळले जात नाहीत. कोणत्याही सजीवाला इजा केली जात नाही. भाजणी, राजीगरा, चिरमुरे, खोबरे, रवा आणि कडक लाडवांचा, लाह्यांचा आणि फळांचा आहारात समावेश असतो. २१ दिवस दिवाळीसारखे फराळ केले जातात. कोणत्याही यंत्राचा वापर केला जात नाही. - शोभा तळसंदेकर, चंदगड.
अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आता कुंभार समाजातील काहीजणांनी पुढाकार घेतला आहे. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आता कुंभार समाजातील काहीजणांनी पुढाकार घेतला आहे. - अनिल चौगुले, निसर्गप्रेमी.