बेपत्ता पतीचा खून पत्नीकडून
By Admin | Updated: February 8, 2015 00:49 IST2015-02-08T00:34:55+5:302015-02-08T00:49:37+5:30
अनैतिक संबंधातून कृत्य : सूपारी दिली : प्रियकरासह तिघांना अटक

बेपत्ता पतीचा खून पत्नीकडून
कुरुंदवाड : सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता म्हणून दाखल झालेल्या याकूब भाऊसोा तिवडे (वय ३६, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) याचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना कुरुंदवाड पोलिसांनी आज (शनिवार) उघडकीस आणली. पत्नी ज्योती तिवडे, तिचा प्रियकर बाजीराव बापू बोराडे (२६, रा. हातकणंगले), जितेंद्र सुरेश तांबट (३०, रा. कोल्हापूर) यांना पोलिसांनी अटक केली, तर खुनामध्ये सहभागी असलेला राहुल सोनुले (रा. कोल्हापूर) हा फरार आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, याकूब तिवडे याचा टेम्पोचा व्यवसाय होता. २ सप्टेंबर २०१४ रोजी टेम्पो व त्याच्या चपला नांदणी-कुरुंदवाड दरम्यानच्या पंचगंगा नदीवरील पुलावर आढळल्या. त्यामुळे पती बेपत्ता झाल्याची फिर्याद पत्नी ज्योती हिने कुरुंदवाड पोलिसांत दिली होती.
कुरुंदवाड पोलीसाच्या गुन्हे तपास पथकाला तिवडेचा खून झाल्याची माहिती खबऱ्यांद्वारे मिळाली होती. त्यानुसार तपास केला असता पत्नी ज्योती तिवडे हिचे आरोपी बाजीराव बोराडे याच्याशी अनैतिक संबंध होते. मात्र, या संबंधात अडथळा येत असल्याने पतीचा अडसर दूर करण्यासाठी खुनाचा कट रचण्यात आला. १ सप्टेंबर २०१४ रोजी बाजीराव खोराडे, जितेंद्र तांबट व राहुल सोनुले यांनी याकूबला रात्री शहापूर येथील दारूदुकानात नेऊन दारूमध्ये गुंगीच्या गोळ्या घालून त्याला बेशुद्ध केले. त्याच्याच टेम्पोतून नांदणी पुलावरून त्याला नदीमध्ये ढकलण्यात आले. टेम्पो व चपला तिथेच ठेवून आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला; मात्र पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पत्नी ज्योती तिवडेचा प्रियकर बोराडे याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच खुनाची कबुली दिली. तिघांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.