मनपा शाळा पगारापुरत्याच
By Admin | Updated: December 1, 2014 00:01 IST2014-11-30T23:31:45+5:302014-12-01T00:01:00+5:30
गुरुजी फुल्ल, विद्यार्थी गूल : सर्व सुविधा असतानाही झालीय दयनीय अवस्था

मनपा शाळा पगारापुरत्याच
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील दत्ताजीराव माने विद्यालय. महानगरपालिकेची शाळा क्रमांक ८. शाळा कसली तर दणकट अशी दगडी दुमजली इमारत. प्रशस्त अशा चांगल्या १८ खोल्या आहेत. छोटेखानी खेळाचे मैदान. शाळेत लाईट, पाण्याची सोय. बसायला सर्व विद्यार्थ्यांना बाकडी. तीन संगणक, चार शिक्षक व एक शिक्षकेतर कर्मचारी. विद्यार्थ्यांना वर्षाला दोन गणवेश, पाठ्यपुस्तके मोफत दिली जातात. तरीही पहिली ते सातवीपर्यंत या शाळेत विद्यार्थी आहेत केवळ ३२ !
मंगळवार पेठेतील महाराणी ताराबाई प्राथमिक विद्यालय. बैठी स्लॅबची इमारत. दुसरी इमारत कौलारू. जवळपास वीसहून अधिक खोल्या. प्रशस्त खेळाचे मैदान. दीडशे विद्यार्थी एकाचवेळी बसू शकतील असा हॉल. विशेष म्हणजे ई लर्निंगची सोय आहे. पहिली ते सातवी मुले-मुली मिळून विद्यार्थ्यांची संख्या आहे १५७! बालकल्याण संकुलाची शाळा या शाळेत वर्ग केल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढलीय. शाळेतील नव्वद टक्के विद्यार्थी हे अनाथ असलेली, बालकल्याण संकुलातील. म्हणजे केवळ १५ ते १६ विद्यार्थी हे परिसरातील आहेत. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली म्हणून मुली व मुलांची शाळा आता एकत्रच भरविण्याची वेळ आलीय.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांचे हे प्रातिनिधीक उदाहरण आहे. अशीच अवस्था काही मोजक्या शाळा सोडल्या तर पालिकेच्या सर्वच शाळांचे विदारक चित्र पाहायला मिळते. एकेकाळी महानगरपालिकेच्या याच शाळा समाजाच्या आदर्श होत्या. शाळेत प्रवेश मिळावा म्हणून स्कूल बोर्डच्या सदस्यांना विनवण्या करायला लागायच्या. एकेका शिक्षकांची ख्याती अशी होती की, त्या शाळा अमुक एका गुरुजींची शाळा म्हणून ओळखल्या जायच्या. अनेक पिढ्या या शाळेत शिकल्या, मोठ्या झाल्या. अनेक गुणवंत विद्यार्थी घडले. पण आज असं काय झालंय या शाळांना?
ज्या शाळेत २०० ते २५० विद्यार्थी असायचे, त्याच शाळेत आज २० ते २५ विद्यार्थी आहेत. पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने जास्त सुविधा विद्यार्थ्यांना मिळत आणि पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने शिक्षकांना जादा पगार मिळत असताना या शाळा अशा विद्यार्थ्यांविना का ओस पडायला लागल्या आहेत. कोण याला जबाबदार आहे. या सर्व प्रश्नांची चर्चा कोणी करत नाही. गलेलठ्ठ पगार घेणारे अधिकारीही याचा विचार करीत नाहीत, आणि ज्यांना शिकविण्यासाठी पगार मिळतो त्या शिक्षकांनाही त्याची चिंता वाटत नाही. ‘चलता है चलने दो’, ‘मला पगार मिळतोय ना’ अशा मानसिकतेत या शाळा अडकल्या आहेत, हे मात्र नक्की! (प्रतिनिधी)
महाराणी ताराबाई विद्यालयाची इमारत दुर्लक्षित झाली आहे. विद्यार्थ्यांऐवजी जनावरांचे आश्रयस्थान म्हणूनच ही शाळा ओळखली जाते. पहारेकरी नसल्याने इमारतीतील वस्तू चोरीला जात आहेत. महापालिका शिक्षण मंडळाने या इमारतीचे पावित्र जपावे.
- लाडजी राऊळ
दत्ताजीराव माने विद्यालय या शाळेचा वेगळा असा नावलौकिक होता; परंतु गेल्या आठ-दहा वर्षांपासून शाळेला उतरती कळा लागली आहे. पटसंख्यावाढीसाठी कोणीही जाणीवपूर्वक प्रयत्न केले नसल्याने आज ही शाळा ओस पडलीय. खासगी शाळांबद्दल पालकांचे असलेले आकर्षणही याला कारणीभूत आहे.
- दयानंद सावंत
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा
मराठी माध्यम - ५४ उर्दू माध्यम- ५
विद्यार्थ्यांची संख्या - मनपा शाळातील विद्यार्थी - ९,५९१
आरटीई अॅक्ट २००९ नुसार शिक्षक संख्या - मराठी माध्यम - मंजूर ३४९ पैकी ३०७ शिक्षक कार्यरत. उर्दू माध्यम - मंजूर ४१ पैकी २६ शिक्षक कार्यरत.
मनपा फंडातील शिक्षक कर्मचारी- कला शिक्षक ८, बी. एड्. ३६ शिक्षक कार्यरत.
शिक्षके तर कर्मचारी - सेवक - ११२, वॉचमन - ५० एकूण- १६२. त्यापैकी अतिरिक्त ६० कर्मचारी मनपाकडे कार्यरत.
शहरातील खासगी प्राथमिक शाळांचा विस्तार - खासगी अनुदानित प्राथमिक शाळा - ६४
अनुदानित खासगी शाळातील विद्यार्थ्यांची संख्या - २३,१०६
खासगी विनाअनुदानित शाळा - मराठी व इंग्रजी माध्यमाच्या ४८ शाळा. त्यापैकी कायम विनाअनुदानित ४०, विनाअनुदानित ५, स्वयंअर्थ सहाय्यित २ व अंशत:
अनुदानित १.
सर्व विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या - १८,०४८