रेमडेसिविर, ऑक्सिजन साठा, बेड वाढविण्याला महापालिकेचे प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:23 IST2021-05-01T04:23:27+5:302021-05-01T04:23:27+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याकरिता १५०० डोसचा पुरवठा झाला असून, आज, शनिवारी ...

रेमडेसिविर, ऑक्सिजन साठा, बेड वाढविण्याला महापालिकेचे प्राधान्य
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याकरिता १५०० डोसचा पुरवठा झाला असून, आज, शनिवारी विक्रमनगर येथील भगवान महावीर वॉर्ड रुग्णालयात लसीकरण केले जाणार असल्याची माहिती शुक्रवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. संभाव्य रुग्ण वाढ लक्षात घेऊन आम्ही रेमडेसिविर, ऑक्सिजनचा साठा करून ठेवत असून, रुग्ण वाढतील तशी कोविड केंद्र सुरू करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
लसीकरणातील सुसूत्रता राखण्यासाठी ऑनलाईन नोंदणी तसेच पूर्व तारीख व वेळ घेतलेल्यांनाच प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महासैनिक दरबार येथे ११० बेडचे तसेच हॉकी स्टेडियम येथे ४२ बेडचे कोविड केंद्र सुरू करण्यात येणार आहे. साखर कारखान्याकडून काही ऑक्सिजन सिलिंडर घेऊन साठा करण्यात येत आहे. महापालिका स्वत:च्या निधीतून रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करणार असून, ऑर्डर देण्यात आली आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.
डेथ ऑडिटसाठी कमिटी-
शहरातील महापालिका तसेच खासगी रुग्णालयात कोविडमुळे मृत होणाऱ्या व्यक्तींचे डेथऑडिट करण्यात येणार असून, त्याकरिता अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसुळ, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, डॉ. रमेश जाधव यांची कमिटी करण्यात आली आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.
-शहरातील कोविड चित्र-
१. प्रतिबंधित क्षेत्राच्या आतील चित्र -
-सध्याचे प्रतिबंधित क्षेत्र - १८७
- या क्षेत्रातील घरांची संख्या - १३ हजार १७०
- या घरातील स्वॅब घेतलेल्यांची संख्या - २९७६
- यापैकी कोरोनाबाधितांची संख्या - १३६
- सर्दी, खोकला असलेले रुग्ण संख्या - ५६५
- यापैकी कोरोनाबाधितांची संख्या - ४१
२. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील चित्र -
- शिक्षकांची ९३ पथके कार्यरत
- सहव्याधी असलेल्यांचे सर्वेक्षण - ३६९७
- यापैकी स्वॅब घेतलेल्यांची संख्या - १२५९
- सर्दी, खोकला असलेल्यांची संख्या - २६२
- यापैकी कोरोनाबाधित आढळलेले रुग्ण - ३४
३. रुग्णांची संख्या
-आयसोलेशन - ३० रुग्ण ओटू, ४० रुग्ण नॉन ओटू, २ व्हेन्टिलेटरवर
- डीओटी - ओटूचे १९ रुग्ण, नॉनओटूचे २४२
- शिवाजी विद्यापीठ सीसीसी - १२८
- ग्रामीण भागातील रुग्ण संख्या - १४७
४. दंडात्मक कारवाई अशी -
- आठ दुकानांवर १२ हजारांचा दंड
- विनामास्क कारवाई २३ व्यक्ती, दंड ११ हजार ५००
५. आतापर्यंतचे लसीकरण-
- ४५ वर्षांवरील लाभार्थी संख्या - १,९७,११३
- पहिला डोस - १,०७,७९८, दुसरा डोस - २५,२३०
- १८ ते ४४ वर्षातील लाभार्थी - २,८२,०८८
६. खासगी संस्थांची कोविड केंद्र -
-सायबरतर्फे ४२ ओटू बेडसह ११० बेडचे सेंटर सुरू करणार.
- जैन बोर्डिंग , दसरा चौक - ५० बेड
रुग्णालये, कोविडसेंटचे ऑडिट -
शहरातील महानगरपालिका, खासगी रुग्णालयाचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिकल, फायर यांचे ऑडिट करून घेण्यात आले आहे. ऑक्सिजन साठा, पुरवठा पाईपलाईन, इलेक्ट्रिकलाईन सुस्थितीत आहेत किंवा नाही, याची महापालिकेने खात्री करुन घेतली आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.