महापालिकेच्या फस्त जागांची चौकशी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:48 AM2018-04-14T00:48:03+5:302018-04-14T00:48:03+5:30

The municipal corporation will be conducting inquiry | महापालिकेच्या फस्त जागांची चौकशी करणार

महापालिकेच्या फस्त जागांची चौकशी करणार

googlenewsNext


कोल्हापूर : महापालिकेत गेल्या वीस वर्षांत विविध आरक्षणे उठवून फस्त केलेल्या जागांची चौकशी करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. धनगर समाजाची जागा बळकावून कुणी हॉस्पिटले उभा केली; महापालिकेत करार करून कुणी तलावात पार्क उभा केला, कुणाच्या हॉटेलचे पार्किंग कोणत्या जागेत आहे, कुणाच्या मंगल कार्यालयाचे किती मजले उभे राहिले याची नक्की चौकशी करणार आहे. मी काही चौकशीची मागणी करून गप्प बसायला नुसता विरोधी पक्षनेता नाही. मी स्वत:च या राज्य मंत्रिमंडळात दोन नंबरचे स्थान असलेला मंत्री असल्याने थेट चौकशीच सुरू करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
त्याचबरोबर तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण कारवाई रोखण्यामध्ये आपला कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्र्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे तावडे हॉटेल परिसर बांधकाम प्रकरणावर भाजप व दोन्ही काँग्रेसमध्ये वाद वाढण्याची चिन्हे आहेत. यावेळी आमदार अमल महाडिक, बाबा इंदुलकर उपस्थित होते.
मी आजपर्यंत फक्त सकारात्मक कामांची माहिती देण्यासाठीच पत्रकार परिषद घेत होतो; परंतु आज वेगळ्या विषयांवर बोलणार असल्याचे सुरुवातीलाच सांगून मंत्री पाटील म्हणाले, ‘उचगावमधील इमारती वाचविण्याच्या मागे मी उभा उसल्याचे चुकीचे चित्र तयार केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे व मी त्या इमारती पाडू देत नाही, असेही सांगण्यात येत आहे; परंतु या जागेवर महापालिकेने मालकी सांगण्यापूर्वी उचगाव ग्रामपंचायतीकडून एका व्यक्तीने ही जागा घेऊन त्याचे भूखंड पाडले व त्यावर ग्रामपंचायतीकडून परवानगी घेऊन बांधकामे झाली. हद्दवाढीत आलेली बांधकामे त्यांच्याकडून दंड भरून नियमित केली जातात. राज्य सरकारचे धोरण हे पूरक निर्णय घेणारे असते.
बगलबच्च्यांना घेऊन नव्हे...
स्वत: पुढे येऊन टीका करा
महापालिकेत काँग्रेसवाले सत्ता मिळवत होते, ते या शहराचा विकास करायचा म्हणून नव्हे; तर आरक्षणे उठवून जागा लाटण्यासाठीच त्यांना सत्ता हवी होती. हे कोण करीत होते, त्यांचे कुणाचेही नाव मी घेणार नाही. हे कुणी केले आहे, त्याला ती टोपी बसेल. तुमच्यात हिंमत असेल तर बगलबच्च्यांना नव्हे, तर तुम्ही स्वत: नाव घेऊन टीका करा. चिल्ल्यापिल्ल्यांना पुढे करू नका. मी त्या सगळ्यांना उत्तर द्यायला समर्थ आहे, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

येडा आहे का...?
‘नेता म्हणून तुमची प्रतिमा शांत, संयमी असताना आज अचानक इतके आक्रमक व संतप्त का झाला आहात?’ अशी विचारणा पत्रकारांनी केल्यावर मंत्री पाटील म्हणाले, ‘जेव्हा गोष्टी साचत जातात तेव्हा त्यांचा स्फोट होतो. ऊठसूट कुणीही आरोप करून ते खपवून घ्यायला मी येडा आहे का...?’

Web Title: The municipal corporation will be conducting inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.