महापालिकेतर्फे जप्तीची कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 12:08 IST2020-01-24T12:06:03+5:302020-01-24T12:08:22+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्या वतीने गुरुवारपासून थकबाकीदार मिळकतधारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली.

कोल्हापूर महानगरपालिका घरफाळा विभागाने गुरुवारी घरफाळा थकबाकीबद्दल शहरातील दोन मिळकती जप्त करून ताब्यात घेतल्या.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्या वतीने गुरुवारपासून थकबाकीदार मिळकतधारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली.
याअंतर्गत ताराराणी कार्यालय घरफाळा विभागाच्या जप्ती पथकाने न्यू शाहूपुरी येथील प्रभाकर प्लाझा येथील दोन मिळकतीवर कारवाई करून त्या मिळकती सिलबंद केल्या. सदरची मोहीम उपायुक्त धनंजय आंधळे व करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
घरफाळा विभागाने शहरातील विविध भागांतील एक लाख रुपयांच्या वर थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना जप्तीच्या नोटीस पाठविल्या आहेत. त्यानुसार ताराराणी विभागीय कार्यालयाकडील घरफाळा विभागाने मिळकतधारकांना थकबाकी भरण्याकरिता वारंवार सूचना देऊनही येथील मिळकतधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सदरची कारवाई करण्यात आली.
महानगरपालिकेमार्फत दंडाच्या रकमेमध्ये कोणतीही सवलत यावर्षी देय नसल्याने मिळकतधारकांनी त्यांची थकबाकीची रक्कम भरणे गरजेचे आहे, असे यापूर्वीच सूचित करण्यात आले होते. तरीही थकबाकीदार सवलत मिळेल म्हणून घरफाळा भरण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत.
प्रभाकर प्लाझामधील प्रभाकरपंत शिरगावकर भोगवटादार वासुदेव कलघटगी यांचे गाळा क्रमांक एटी-१, (करदाता क्रमांक १७१४६८) यांची पाच लाख ३४ हजार ८१७ रुपयांची थकबाकी होती, तसेच भोगवटादार जितेंद्र जोशी, गाळा क्रमांक एटी-६ (करदाता क्रमांक १७१४६४) यांची एक लाख २३ हजार ४६८ रुपयांची थकबाकी होती.
त्यांना सात दिवसांत थकबाकी भरा; अन्यथा आपली मिळकत जप्त करण्यात येईल, अशी नोटीस बजावण्यात आली होती. नोटिसीची मुदत संपल्यानंतर आठ दिवसांनी थकबाकी, दंड भरला नाही म्हणून गुरुवारी या दोघांच्या मिळकती जप्त करून ताब्यात घेण्यात आल्या.
सदरची कारवाई कर अधीक्षक अनिरुद्ध शेटे, साहाय्यक कर अधीक्षक विजय वणकुद्रे, भगवान मांजरे, मनीष अतिग्रे, अर्जुन बुचडे, महेश आगळे, प्रशांत धामणे, जैलानी शेख, मुकुंद कांबळे, अरविंद कोळेकर यांनी पार पाडली.
शहरातील सर्व मिळकतधारकांनी त्यांच्या मिळकतीचा घरफाळा तत्काळ नागरी सुविधा केंद्रात अथवा आॅनलाईन भरून दंड अथवा जप्तीसारखा कटुप्रसंग टाळून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन घरफाळा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
२०० मिळकती कारवाईच्या कक्षेत
घरफाळा विभागाने एक महिन्यापूर्वी एक लाख रुपयांच्या वर ज्यांची थकबाकी आहे, अशा शहरातील सुमारे २०० मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्या मिळकतधारकांना पोहोचल्या आहेत.
तरीही थकबाकीच्या दंडामध्ये सवलत मिळेल, अशा अपेक्षेने त्यांनी त्यांचा घरफाळा भरलेला नाही; मात्र अशी कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गुरुवारपासून तर प्रत्यक्ष कारवाईलाच सुरुवात केली. २०० मिळकती कारवाईच्या कक्षेत असल्याने त्यांच्यावरसुद्धा जप्ती येऊ शकते.