महापालिकेचे अंदाजपत्रक आज जाहीर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:40+5:302021-03-24T04:22:40+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेत प्रशासकीय कारभार सुरू झाल्यामुळे यंदा नवीन वर्षांचे अंदाजपत्रक आज, बुधवारी दुपारी बारा वाजता प्रशासक डॉ. कादंबरी ...

महापालिकेचे अंदाजपत्रक आज जाहीर होणार
कोल्हापूर : महानगरपालिकेत प्रशासकीय कारभार सुरू झाल्यामुळे यंदा नवीन वर्षांचे अंदाजपत्रक आज, बुधवारी दुपारी बारा वाजता प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे या पत्रकार परिषदेत जाहीर करणार आहेत. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ केली जाऊ नये, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून केली जात आहे, त्यामुळे प्रशासक कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
महानगरपालिकेचे लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासक बलकवडे यांना असलेल्या अधिकारात प्रशासकीय ठराव मंजुरीने नवीन वर्षाचे अंदाजपत्रक जाहीर करतील. गेल्या काही दिवसांपासून प्रशासक बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, लेखापाल संजय सरनाईक यांनी अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यामुळे स्वाभाविकच या अंदाजपत्रकावर अधिकाऱ्यांच्या कारभाराचा छाप उमटलेला असेल.
घरफाळा, पाणीपट्टी, परवाना फी, नगररचना विभागाच्या फी वाढणार की नाहीत, वाढल्या तर त्या किती टक्के वाढणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीच करवाढ लादली जाऊ नये, अशी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका आहे. तशी मागणी करण्याकरिता बलकवडे यांना भेटायला माजी पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मंगळवारी जाणार होते; पण ही भेट झाली नाही. त्यामुळे माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी बलकवडे यांच्या कार्यालयात एक निवेदन पाठवून दिले.
सन २०१९-२० या सालात न भूतो असा महापूर आला. त्यानंतर २०२०-२०२१ सालात कोरोना, लॉकडाऊनचे संकट आले. कोरोनाच्या काळात बरेच व्यवसाय बंद होते. अनेकांचे रोजगार बुडाले. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत कोणतीही करवाढ केली तर त्याचा मोठा फटका बसणार आहे. म्हणूनच परिस्थितीचा विचार करून कसलीही करवाढ करू नये, असे आजरेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर महासभेला योग फेरबदल करण्याचा अधिकार असणार आहे. त्यामुळे प्रशासकीय अंदाजपत्रकातील फेरबदल नंतर होणार आहेत. साधारण डिसेंबर महिन्यात हे बदल होऊ शकतात.