महानगरपालिका प्रशासनाची खाऊगाडीवाल्यांवर कारवाई : २० सिलिंडर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 14:22 IST2020-06-02T14:22:00+5:302020-06-02T14:22:42+5:30
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत होत असताना ज्यांना कोणी वाली नाही अशा खाद्य पदार्थ विक्रेत्या गाडीवाल्यांवर महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला.

कोल्हापूर शहरात सुरु झालेल्या काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्यांवर मंगळवारी महानगरपालिका प्रशासनाने सिलिंडर जप्तीच्या कारवाई केली.
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत होत असताना ज्यांना कोणी वाली नाही अशा खाद्य पदार्थ विक्रेत्या गाडीवाल्यांवर महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला.
दि. २२ मार्चपासून शहरात कोरोना संसर्गाची चाहूल लागली आणि पुढे चार दिवसांनी शहरातील सर्वच व्यवहार बंद झाले. केवळ महिन्याभरात त्याची तीव्र झळ रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या छोट्या व्यावसायिकांना बसली.
ज्या पध्दतीने हॉटेल व्यवसायिकांना केवळ पार्सल सेवा देण्यास परवानगी दिली तशी ती या खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना देणे आवश्यक होते. पण ती दिली नाही.
गेल्या काही दिवसापासून शहरात या विक्रेत्यांनी पार्सल सेवा देण्यास सुरवात केली आहे. मात्र या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या तक्रारी नंतर महापालिका प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरवात केली. मंगळवारी अतिक्रमण निर्मुलन पथकाने कळंबा साई मंदिरपासून कारवाईला प्रारंभ केला. कळंबा, संभाजीनगर, पाण्याचा खजिना, कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, उमा टॉकीज, लक्ष्मीपुरी या परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई म्हणून त्यांची २० हून अधिक सिलिंडर जप्त केली.