मुत्सद्दी ‘राष्ट्रवादी’मुळे मित्रपक्ष घायाळ
By Admin | Updated: July 10, 2014 00:58 IST2014-07-10T00:57:51+5:302014-07-10T00:58:46+5:30
आजरा साखर कारखाना : पदाधिकारी निवडीला विधानसभा निवडणुकीची किनार

मुत्सद्दी ‘राष्ट्रवादी’मुळे मित्रपक्ष घायाळ
ज्योतीप्रसाद सावंत - आजरा ,सत्तांतरासाठी सर्वपक्षीयांनी मोट एकत्र बांधायची, सत्ता मिळाल्यानंतर मात्र पद्धतशीररीत्या संस्थेवर आपले वर्चस्व ठेवायचे, असा काहीसा जुनाच फॉर्म्युला ‘राष्ट्रवादी’कडून आजरा साखर कारखाना निवडणुकीत वापरला जात आहे. कारखान्यासारख्या महत्त्वाच्या सहकारी संस्थेची सूत्रे सहजासहजी आणि तेही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्षांकडे सोपविण्याची घोडचूक नेतेमंडळी करतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. यामुळे मित्रपक्षांकडे केवळ बघ्याची भूमिका राहिली आहे.
सत्तांतरानंतर अध्यक्षपदाचे पहिले दावेदार विष्णुपंत केसरकर होते; पंरतु ऐनवेळी वसंतराव धुरे यांचे नाव पुढे आले. अध्यक्षपदासाठी तीन वर्षे केसरकर ‘वेटिंग’वरच राहिले. यावेळीही केसरकरांना अध्यक्षपदापासून रोखण्यास काही संचालक सक्रिय होते; पंरतु केसरकरांना डावलणे हे तितकेसे सोपे नसल्याने नेतेमंडळींनी अखेर त्यांच्या ‘अध्यक्षपदा’वर शिक्कामोर्तब करून टाकले.
अध्यक्षपदाचा निर्णय संपत आला असतानाच उपाध्यक्षपदाचा मुद्दा ऐरणीवर आला. सत्तेतील घटकपक्ष या नात्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपाध्यक्षपदी संधी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडे सुरू केली. संघटनेचे दोन संचालक असताना आनंदराव कुलकर्णी यांचे संघटनेकडून नाव पुढे आणले गेले. मिसाळ व जाधव या दोन्ही पर्यायांना स्वाभिमानीकडून विरोध झाला. उपाध्यक्षपद स्वाभिमानीला द्या, तर मग कुलकर्णी स्वाभिमानीचे आहेतका? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. उपाध्यक्षपद द्या; पण मिसाळ नको, असा ठेका स्वाभिमानीने धरल्याने संघटनेतील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला. कुलकर्णी यांचा चेहरा पुढे करून चंदगड-गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघात ‘स्वाभिमानी’च्या उमेदवाराला बळकटी देण्याचा संघटनेचा हेतूही स्पष्ट झाला.
मुळातच येत्या विधानसभेत या मतदारसंघात राष्ट्रवादीसमोर स्वाभिमानीचे कडवे आव्हान असणार हे सर्वश्रृत आहे, अशावेळी राष्ट्रवादीचे नेते उपाध्यक्षपद स्वाभिमानीकडे देण्याचा मूर्खपणा करणार नाही हेही स्पष्ट झाले.
परिणामी स्वाभिमानी हतबल झाली, तर तिकडे प्रा. सुनील शिंत्रे व श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी पदाधिकारी निवडीच्या पद्धतीबद्दल उघड नाराजी व्यक्त करीत सभेकडे पाठ फिरविली. हे देखील राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडले असून, त्यामुळे उपाध्यक्षपदी घोरपडे यांची निवड होण्यात फारशी अडचण आली नाही.