MSEDCL Sub-Center Assistant Document Verification Postponed | महावितरण उपकेंद्र सहायक कागदपत्र पडताळणी स्थगित

महावितरणच्या उपकेंद्र सहायक पदाची भरती प्रक्रिया रद्द करावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी कोल्हापुरात महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मराठा क्रांती मोर्चाचे स्वप्निल पार्टे यांनी मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांच्या दिशेने फाईल भिरकावली. (छाया- नसीर अत्तार)

ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चाकडून अधिकारी धारेवर अधिकाऱ्यांच्या अंगावर कागदपत्रे, डायरी भिरकावल्याने तणाव

कोल्हापूर : महावितरण कंपनीतील उपकेंद्र सहायक भरती रद्द करावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्या अंगावर कागदपत्रे व डायरी भिरकावली. भरती प्रक्रिया थांबवत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांना बाहेर सोडणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर अखेर उपकेंद्र सहायक कागदपत्र पडताळणी स्थगित करण्यात आली.

महावितरणमध्ये उपकेंद्र सहायकाची दोन हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये ह्यएसईबीसीह्ण साठी २४५ पदे राखीव आहेत. या प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. याबाबत, मराठा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांना जाब विचारला.

वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया सुरू असल्याचे निर्मळे यांनी सांगितले. यावर, जोरदार आक्षेप घेत पदाधिकाऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. संतप्त सचिन तोडकर यांनी कागदपत्रे फाडून तर स्वप्निल पार्टे यांनी टेबलवरील डायरी निर्मळे यांच्या दिशेने भिरकावल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी हस्तक्षेप करत पदाधिकाऱ्यांना शांत केले.

पदाधिकाऱ्यांंचे रौद्र रूप पाहून प्रभाकर निर्मळे यांनी प्रादेशिक संचालक, पुणे अंकुश नाळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आंदोलनकर्त्यांची भूमिका सांगितली. यावर, कागदपत्र पडताळणी प्रक्रिया स्थगित करण्यास त्यांना सांगितले. तसे लेखी घेतल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी कार्यालय सोडले.
 

Web Title: MSEDCL Sub-Center Assistant Document Verification Postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.