कोल्हापूर : काम केले, तर जाहिरात करण्याची गरज काय आहे. जो काम करतो. ते लोकांना माहिती असते. त्यामुळे जाहिरातबाजी करण्याची आवश्यकता नसते. मला कोणावर टीका-टिप्पणी करायची नाही आणि श्रेयवादही घ्यायचे नसल्याचे सांगत खासदार धनंजय महाडिक यांनी टोलेबाजी केली. कोल्हापूर-मुंबईविमानसेवेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.महाडिक म्हणाले, विमानतळ विकासासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. भाजपने संधी दिल्यानंतर आणि खासदार झाल्यानंतर विमानतळाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे काम केले. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न आता मार्गी लागल्याचे सर्वांना माहीत आहे. केंद्र आणि राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांचे आहे. लोकांच्या गरजा ओळखून त्यांची पूर्तता करणारे, आवश्यक सोयी-सुविधा पुरविणारे हे सरकार आहे. त्यामुळे वेगळी जाहिरात करण्याची आम्हाला गरज नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.अंबाबाईच्या दर्शनासाठी अनेक भाविक कोल्हापुरात येतात. विविध क्षेत्रात कोल्हापूर आघाडीवर आहे. येथील विकासाची गती वाढविण्यासाठी कोल्हापूर-मुंबई नियमित विमानसेवा गरजेची होती. ही गरज आता स्टार एअरच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूर, मुंबईतील भाविक, उद्योजक, व्यापारी, पर्यटक, आदींना या सेवेचा चांगला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
..तर जाहिरातबाजीची गरज काय; कोल्हापूर-मुंबई विमानसेवेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी धनंजय महाडिकांची टोलेबाजी
By संतोष.मिठारी | Updated: October 4, 2022 15:44 IST