विषय समित्यांसाठी हालचाली गतिमान
By Admin | Updated: December 11, 2014 23:50 IST2014-12-11T22:27:00+5:302014-12-11T23:50:52+5:30
काँग्रेस पक्षश्रेष्ठींना साकडे : पण राष्ट्रवादी अद्याप शांतच

विषय समित्यांसाठी हालचाली गतिमान
इचलकरंजी : नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवडणूक जाहीर होताच इच्छुकांनी सभापतिपदासाठी जोरदार हालचालींना सुरुवात केली आहे. कॉँग्रेसच्या काही नगरसेवक व नगरसेविकांनी पक्षश्रेष्ठींना भेटून साकडे घातले. मात्र, राष्ट्रवादीच्या पातळीवर अद्याप शांतताच आहे. बांधकाम, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व महिला बालकल्याण या पाच समित्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २२ डिसेंबर रोजी निवडणूक जाहीर केली आहे. पालिकेत दोन्ही कॉँग्रेसची आघाडी सत्तेवर असून, कॉँग्रेसकडे पाणीपुरवठा, आरोग्य व महिला बालकल्याण या तीन समित्यांचे सभापतिपद आणि राष्ट्रवादीकडे बांधकाम व शिक्षण या दोन समित्यांचे सभापतिपद देण्यात येणार आहे. यातील पाणीपुरवठा व बांधकाम या दोन समित्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने दोन्ही समित्यांकडे सभापतिपदासाठी जोरदार स्पर्धा आहे. पाणीपुरवठा समितीसाठी दिलीप झोळ व रवी रजपुते, बांधकामसाठी लतीफ गैबान व भाऊसाहेब आवळे, आरोग्य समितीसाठी मीना बेडगे व सुजाता बोंगाळे यांच्या नावाची चर्चा आहे. शिक्षण व महिला बालकल्याण या दोन समित्यांकडील नावांची चर्चा आहे. (प्रतिनिधी) ‘आरोग्य’साठी तिघी इच्छुक आयजीएम हॉस्पिटलमध्ये ३५० खाटांचा दवाखाना सक्षमपणे चालू करण्याचा प्रस्ताव आमदार सुरेश हाळवणकर यांनी शासनाकडे दिला आहे. सुमारे ३६ कोटींचा हा प्रस्ताव असून, त्यामुळे आरोग्य समितीसुद्धा आता आर्थिकदृष्ट्या सबळ होईल, या अपक्षेने आरोग्य समितीच्या सभापतिपदासाठीसुद्धा स्पर्धा निर्माण झाली आहे. बोंगाळे व बेडगे यांच्या बरोबरीनेच भक्ती बोंगार्डे यांचेही नाव पुढे येत आहे.