दरवाढीत पुढे, सुविधांत मात्र मागे
By Admin | Updated: July 1, 2014 00:56 IST2014-07-01T00:53:15+5:302014-07-01T00:56:17+5:30
किणी टोलनाका : कोगनोळी नाक्याच्या दुप्पट दर; वाहनधारकांची सुरू आहे लूट

दरवाढीत पुढे, सुविधांत मात्र मागे
संतोष भोसले ल्ल किणी
पुणे ते बंगलोर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम एकाचवेळी एकाच योजनेतून झाले; पण या महामार्गावर सुविधा देताना महाराष्ट्र नेहमीच मागे राहिला, तर कर्नाटकात सर्व सोयी-सुविधा देऊनही नजीकच्या कोगनोळी कर्नाटक नाक्यावर अत्यल्प टोलदर आकारला जातो.
किणी टोलनाका सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला आहे. या ठिकाणच्या अरेरावीचा अनुभव भल्याभल्यांनी घेतला आहे. या टोलनाक्यावर भरमसाठ दर आकारूनही रस्त्यांवर आवश्यक सुविधा नसल्याने वाहनधारकांची अक्षरश: लूट चालू आहे. त्यामुळे वाहनधारकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
देशातील प्रमुख चार महानगरांना जोडण्यासाठी प्रमुख महामार्गाच्या चौपदरीकरणाची योजना राबविण्यात आली. यामध्ये पुणे ते बंगलोर या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम केले.
कर्नाटकात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्यावतीने काम केले. यामध्ये जेवढा महामार्ग तितकेच सेवामार्ग दोन्ही बाजूला करण्यात आला, तर ठिकठिकाणी बस थांबे, वाहनतळ, स्वच्छतागृह, दुभाजकांवर देखणी फुलझाडी लावून महामार्ग आदर्श बनविला आहे, शिवाय टोल मात्र अत्यल्प आहे.
याउलट कागल ते शेंद्रे (सातारा) दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम बी.ओ.टी. तत्त्वावर राज्य रस्ते विकास महामंडळाने विकासातील भागीदार म्हणून केले. यामध्ये महामार्गावर तुटपुंजा सेवा बनविल्या, तर बसस्थानके, स्वच्छतागृहे, वाहनतळ, आदींचा पत्ताच नाही.
सुरुवातीपासूनच दर्जाहीन असुविधांचा मार्ग म्हणून ओळख बनविली असून, प्रत्येकवर्षी एक जुलैला टोल दरवाढ लादून वाहनधारकांची लूट केली जात आहे. साहजिकच वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे.