श्वासोच्छ्वासाच्या अडथळ्यामुळेच हलविले
By Admin | Updated: February 21, 2015 02:11 IST2015-02-21T02:11:30+5:302015-02-21T02:11:43+5:30
मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार : कृत्रिम श्वासोच्छ्वास काढल्यावर पानसरे यांना होतोय त्रास

श्वासोच्छ्वासाच्या अडथळ्यामुळेच हलविले
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर सोमवारी सकाळी ९.२६ वाजता हल्ला झाला. त्यानंतर त्यांना तातडीने येथील अॅस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला शुक्रवारी तब्बल शंभर तास झाले. या काळात त्यांचा कृत्रिम श्वासोच्छ्वास कमी व्हायला हवा होता; परंतु तो न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला (ब्रीच कँडी हॉस्पिटल) हलविण्यात आले होते.त्यांची प्रकृती गंभीर (क्रिटिकल) व स्थिर असल्याची माहिती रुग्णालयामार्फत देण्यात येत होती. उपचारास ते चांगला प्रतिसाद देत होते. शिवाय मेंदू व हृदयाचे कामही व्यवस्थित सुरू असल्याने धोका टळल्याचे डॉक्टरांचेही म्हणणे होते. त्यामुळे त्याच्या पुढचा टप्पा म्हणून गुरुवारनंतर त्यांचे श्वसन सुरळीत होणे अपेक्षित होते. तसे झाले असते तर त्यांच्या प्रकृतीचा धोका पूर्णत: टळला असता. त्याची चाचणी म्हणून डॉक्टरांनी गुरुवारी दुपारी दोन वाजता व चार वाजता असा दोनवेळा त्यांचा कृत्रिम श्वासोच्छ्वास काढून घेतला; पण तसे केल्यावर पानसरे यांना श्वासोच्छ्वास करताना कमालीचा त्रास होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे अनिवार्य ठरले. जास्त दिवस अशा स्थितीत रुग्णाला ठेवणे योग्य नसते. त्यांच्या फुप्फुसाला गोळी लागल्याने तिथे इजा पोहोचली होती. शिवाय त्यामध्ये दोन छोटे डाग दिसत होते. अशा स्थितीत धोका वाढला तर मुंबईला हलविणे धोकादायक ठरेल, असे डॉक्टरांचे मत झाल्याने त्यांना मुंबईला हलविण्याची प्रक्रिया गुरुवारी सायंकाळपासून सुरू झाली होती. (प्रतिनिधी)
कशी
हलली यंत्रणा...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी येण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळले; परंतु त्यांच्यावर चांगले उपचार व्हावेत यासाठी मात्र त्यांनीच पुढाकार घेतल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.
गुरुवारी दुपारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व राज्य सरकार या प्रकरणात आरोपींना शोधण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. आरोपीही सापडलेले नाहीत व राज्य सरकार त्यांच्या उपचाराबाबतही फारसे संवेदनशील नाही, अशी तक्रार होऊ लागल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने पानसरे यांना मुंबईला हलविण्याबाबत यंत्रणा कार्यरत केली.
जिल्हाधिकारी राजाराम माने यांना सकाळी दहा वाजता तसा फोन आला व डॉक्टर आणि कुटुंबीयांशी बोलण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.
माझे वडील असते तरी...
पानसरेंना अचानक मुंबईला हलविण्याची घाई का ? असा
प्रश्न कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांनाही पडला.
त्यांनी त्याबद्दल डॉ. अजय केणी यांच्याकडेही विचारणा केली. त्यावर डॉ. केणी यांनी सांगितले, ‘पानसरे अण्णांच्या ठिकाणी माझे वडील जरी असते तरीही मी हाच निर्णय घेतला असता.