ट्रॅक्टरला धडकून मोटरसायकलस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:51 IST2020-12-05T04:51:54+5:302020-12-05T04:51:54+5:30
कडगाव-गडहिंग्लज : गडहिंग्लज-गारगोटी मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. अपघातात दत्तात्रय पाटील ...

ट्रॅक्टरला धडकून मोटरसायकलस्वार जागीच ठार
कडगाव-गडहिंग्लज :
गडहिंग्लज-गारगोटी मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. अपघातात दत्तात्रय पाटील (मूळ गाव, रा. शिप्पूर तर्फ आजरा, ता. गडहिंग्लज, सध्या रा. उत्तूर, ता. आजरा) असे मृताचे नाव असून, ते कापड व्यापारी आहेत. बुधवारी (दि.२) रात्री आठच्या सुमारास कडगाव येथे हा अपघात झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मूळचे शिप्पूर येथील रहिवासी असणारे दत्तात्रय हे मुंबई येथे बीएसटीमध्ये नोकरीला होते. अलीकडेच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. कोरोनामुळे गावी येऊन त्यांनी अलीकडेच उत्तूर येथे कापड दुकान सुरू केले असून, तिथेच ते कुटुंबीयांसह राहत होते.
बुधवारी (२) संध्याकाळी गडहिंग्लज येथील नातेवाइकांना भेटून ते दुचाकी (एमएच ०९, एक्स ९११६) वरून उत्तूरला जात होते. कडगावनजीक तीन चिंचेजवळ समोरून जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला त्यांनी पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यास गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. गडहिंग्लज पोलिसांत रात्री उशिरा अपघाताची नोंद झाली.
------------------------------------
*
हेल्मेट असूनही..!
दत्तात्रय यांच्या डोक्यावर हेल्मेट होते. परंतु, मोटारसायकल ट्रॅक्टर ट्रॉलीला जोराने धडकल्याने हेल्मेटची काच फुटून चेहरा व डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
------------------------------------
* दत्तात्रय पाटील : ०२१२२०२०-गड-०४