आईने मुलीला जगण्याचे भान द्याव

By Admin | Updated: January 24, 2015 00:08 IST2015-01-24T00:01:18+5:302015-01-24T00:08:13+5:30

अपर्णा रामतीर्थकर : कणेरी येथे मातृशक्ती उत्सवाला गर्दीे

The mother should give the girl the importance of living | आईने मुलीला जगण्याचे भान द्याव

आईने मुलीला जगण्याचे भान द्याव

कोल्हापूर : करिअर आणि फॅशनच्या नावाखाली महिला सध्या सर्व मर्यादा ओलांडत आहेत. भारतीय संस्कृतीत ते नाही. चूल-मूल, सासर-माहेर आणि पै-पाहुणे सांभाळून स्वत:चे अस्तित्व जपायचे म्हणजेच करिअर आहे. त्यामुळे संस्कृती जपण्यासाठी आईने स्वत: जागे होऊन मुलींना जगण्याचे भान द्यावे, असे प्रतिपादन सोलापूरच्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी आज, शुक्रवारी येथे केले. कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावरील भारतीय संस्कृती उत्सवात मातृशक्ती उत्सवात त्या बोलत होत्या.अ‍ॅड. रामतीर्थकर म्हणाल्या, महिला शिकतात, नोकरी करतात, घर सजवितात, आर्थिक स्वावलंबी होतात. मात्र, त्या कुटुंबात यशस्वी होतील, याची खात्री नाही. स्त्रीशक्तीऐवजी स्त्रीमुक्तीकडे महिला धावत आहेत. ते भारतीय संस्कृतीत नाही, भारतीयांना ते रुचणारे नाही. ज्याला आई समजते, त्याला समाज समजतो. डॉ. काटधरे म्हणाल्या, घर हे संस्कृतीचे केंद्र असून त्याचे घरपण कायम कसे राहील, हे स्त्रियांनी पाहावे. सध्या स्त्रिया घरकाम दुय्यम ठरवून करिअरला प्राधान्य देत असून हे घराला मारक, संस्कृती संपविणारे आहे. अरुंधती महाडिक म्हणाल्या, आपल्या देशासारखी संस्कृती जगात कुठेच नाही. सण-उत्सवांद्वारे मुलांवर संस्कार करण्याचे काम घरच्या महिला करतात. आई मुलांना योग्य दिशा देते. यावेळी माताजी वाग्देवी (कर्नाटक), श्यामजीभाई जाजू यांनी विचार मांडले. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार भास्करराव जाधव, आदी उपस्थित होते. आमदार शशिकला ज्वोल्ले यांनी स्वागत केले.

स्वयंसेविका पॅँटमध्ये कशा?
या संस्कृती उत्सवात स्वयंसेविका पॅँटमध्ये कशा आणि उत्सव पाहायला येणाऱ्या मुलींच्या चुडीदारवरील ओढण्या कुठे आहेत, अशी विचारणा अ‍ॅड. रामतीर्थकर यांनी केली. त्या म्हणाल्या, पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरा, केस मोकळे सोडू नका, असे भारतीय संस्कृती सांगते. अगदी त्याउलट फॅशनच्या नावाखाली महिला, मुलींचे वर्तन आहे. ते धोकादायक ठरणारे आहे.


मिशा फुटणार नाहीत, याची दक्षता घ्या
महिलांना देवाने पुरुषांपेक्षा शंभर गुण अधिक दिले आहेत. त्यांनी पुरुषार्थ गाजविला पाहिजे; पण पुरुष होण्याचा प्रयत्न करू नये. पुरुष होण्याचा प्रयत्न करा; मात्र मिशा फुटणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन अ‍ॅड. रामतीर्थकर यांनी यावेळी केले.

Web Title: The mother should give the girl the importance of living

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.