जिल्ह्यातील ५४६ गुन्हेगार मोस्ट वॉन्टेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:30 IST2018-12-31T00:30:39+5:302018-12-31T00:30:50+5:30
एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील खून, गँगवार, खुनाचा प्रयत्न, अत्याचार, दरोडा, फसवणूक अशा गंभीर गुन्ह्णांतील ...

जिल्ह्यातील ५४६ गुन्हेगार मोस्ट वॉन्टेड
एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील खून, गँगवार, खुनाचा प्रयत्न, अत्याचार, दरोडा, फसवणूक अशा गंभीर गुन्ह्णांतील सुमारे ५४६ सराईत गुन्हेगार फरार आहेत. गेल्या ४२ वर्षांपासून पोलीस शोध सुरू आहे, इतकेच कारण सांगत आहेत. फरार गुन्हेगारांना त्यांच्या पत्त्यावर वारंवार नोटिसा देऊनही ते हजर होत नाहीत; त्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘थर्ड डिग्री’पेक्षा आर्थिक फटका बसला, तर पुन्हा कोणी गुन्हेगार फरार होण्याचे धाडस करणार नाहीत. हा उद्देश समोर ठेवून ही कारवाई पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. आतापर्यंत ३५ गुन्हेगारांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.
कोल्हापूरसह सांगली, सातारा, कराड, पुणे, सोलापूर, मुंबई, ठाणे, कर्नाटक, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांतील गुन्हेगारांचा समावेश आहे. हे सर्व गुन्हेगार सराईत असून, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. पोलीस त्यांच्या राहत्या पत्त्यावर गेले, तरी ते मिळून येत नाहीत. नातेवाईकही त्यांची माहिती लपवत आहेत. त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल आहे; परंतु आरोपी अटक नसल्याने हे गुन्हे प्रलंबित आहेत. त्यांना फरार घोषित करून त्यांचे छायाचित्र, माहिती भित्ती फलकावर चिकटविली असून, सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध केली आहे.
शेख ते पवार-अकोळकर
१९७६ पासून राजारामपुरी पोलीस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल असलेला संशयित नन्हासाब बमिदाब शेख (रा. वड्डवाडी-राजारामपुरी) हा फरार आहे. त्याच्या पाठोपाठ २०१५ मध्ये पानसरे हत्येप्रकरणातील संशयित विनय बाबूराव पवार, सारंग दिलीप अकोळकर, अशी ही फरारांची साखळी आहे.
कारागृहातील ३४ कैदी फरार
खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, दरोडा, घरफोडी, अपहरण, खंडणी, आदी विविध गुन्ह्णांत शिक्षा झालेल्या मुंबई, ठाणे, कल्याण, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आदी ठिकाणच्या अंडरवर्ल्ड टोळीमधील गुन्हेगारांसह १८६० कैदी सध्या कारागृहात आहेत. कुटुंबासह स्वत:च्या आजारपणासाठी, तर मुलांच्या शैक्षणिक कामासाठी एक महिन्यासाठी पॅरोलवर (रजा) कळंबा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडलेले सुमारे ६९ कैदी गेल्या चार वर्षांपासून फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात पोलीसही हतबल झाले आहेत.