जानेवारीच्या तुलनेत मार्चमध्ये तिपटीहून अधिक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:24 IST2021-03-31T04:24:56+5:302021-03-31T04:24:56+5:30
कोल्हापूर : लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी कोविड चाचणी करून न घेणे संबंधितांच्या कुटुंबियांसाठी आणि इतरांसाठीही धोकादायक आहे. तेव्हा अधिकाधिक ...

जानेवारीच्या तुलनेत मार्चमध्ये तिपटीहून अधिक रुग्ण
कोल्हापूर : लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी कोविड चाचणी करून न घेणे संबंधितांच्या कुटुंबियांसाठी आणि इतरांसाठीही धोकादायक आहे. तेव्हा अधिकाधिक नागरिकांनी स्वॅब देऊन चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे. कोरोनाचे जानेवारीत ४३१ रुग्ण होते, मार्च अखेर ही संख्या तिपटीहून जास्त म्हणजे १४५८ वर गेली आहे.
जिल्हयामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव परत मोठया प्रमाणात वाढू नये यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. रात्रीची संचारबंदी, मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर दंड आकारणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांवर बंदी, नो मास्क..नो एन्ट्री या उपायांचा यामध्ये समावेश आहे.
प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी स्वॅब नमुने तपासणी करण्याची गरज आहे. कोविड निदानासाठी आर.टी.पी.सी.आर. व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. कोविड चाचणीचे प्रमाण वाढल्यास रुग्णांचे निश्चित निदान होऊन सत्वर उपचार मिळणार आहेत. त्यामुळे रुग्णांचा आजार बळवणार नाही आणि इतरांना संसर्ग होणार नाही, पर्यायाने पॉझिटिव्ह रेट व मृत्युदर नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होणार आहेत.
मात्र जिल्हयातील कोरोना तपासणीसाठी स्वॅब नमुने जास्तीत जास्त घेणे गरजेचे असताना, नागरिक चाचणीसाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे विषाणू संसर्ग वेगाने वाढू शकतो. यासाठी अतिजोखमीचा गट (सुपर स्प्रेडर) , कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले, सर्दी, ताप, खोकला लक्षणे असलेले, प्रतिबंधित क्षेत्रातील व सारीसारखी लक्षणे असलेल्या रुग्णांनी स्वत:हून स्वॅब तपासणी करून घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे, त्यामुळे निदान करणे सोपे होईल. नातेवाईक, कुटुंबीय, मित्रपरिवार, ज्येष्ठ नागरिक, सुरक्षित राहतील.
चौकट
येथे सुरू आहे स्वॅब तपासणी
स्वॅब तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आय.जी.एम., इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज, सर्व तालुक्यातील कोविड काळजी केंद्रे, ॲस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर, डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर, अंबिका लॅबोरेटरी, कोल्हापूर, जीवन लॅबोरेटरी, कोल्हापूर या ठिकाणी तपासणी सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
चौकट
महिन्यानुसार घेतलेले स्वॅब नमुने : पॉझिटिव्ह रुग्ण
जानेवारी २०२१ - २९१६६ : ४३१
फेब्रुवारी २६०२० : ६०१
३० मार्चअखेर ३५४३८ : १४५८