पावसाळ्यापूर्वी कळंबा तलावातील गाळ काढणार
By Admin | Updated: March 20, 2016 01:05 IST2016-03-20T00:49:26+5:302016-03-20T01:05:35+5:30
चंद्रकांतदादा पाटील : जलयुक्त शिवार अभियानातून कामास सुरुवात; तलावाच्या सुशोभीकरणास मदत

पावसाळ्यापूर्वी कळंबा तलावातील गाळ काढणार
कळंबा : ऐतिहासिक कळंबा तलावातील गाळ पावसाळ्यापूर्वी काढला जाईल. यासाठी जी यंत्रसामग्री लागेल, ती दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिली. कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) येथील कळंबा तलाव येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळ काढण्याच्या प्रारंभप्रसंगी शनिवारी ते बोलत होते.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून राज्य २०१९ पर्यंत पाणीटंचाईमुक्त करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. २०१५-१६ ला सरकारने जलयुक्त शिवार अभियानावर १४०० कोटी रुपये खर्च केले, तर यावर्षी २०१६-१७ ला एक हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्याचबरोबर २५ हजार कोटी रुपयांची तरतूद शेतकऱ्यांसाठी केली आहे, तर पाच लाख सोलर पंप शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. तसेच, कळंबा तलावातील गाळ काढण्यात येत आहे. हा गाळ पावसाळ्यापूर्वी काढला जाईल.
सतेज पाटील म्हणाले, कळंबा तलावाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी आणखी यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी. तीन महिन्यांच्या आत काम करण्यास जलसंपदा विभागाला सांगितले आहे. कोणतेही राजकीय हेवे-दावे बाजूला ठेवून हे काम व्हावे. उन्हाळ्यात कळंबा ग्रामस्थांना पाणी पुरविण्यासाठी महापालिका कुठे कमी पडणार नाही. अमल महाडिक म्हणाले, या तलावातील ५० हजार क्युबिक मीटर गाळ काढायचा आहे. काही मदत लागेल ती देऊ. कळंबा तलावासाठी चंद्रकांतदादा पाटील यांची मदत झाली. जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात ५७५ कामे सुरू आहेत, तर २८ कोटी ४० लाखांचा आराखडा तयार आहे.