दत्तवाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST2021-01-25T04:24:48+5:302021-01-25T04:24:48+5:30
दत्तवाड, ता. शिरोळ येथे कोल्हापूर महानगरपालिका व पशुसंवर्धन खाते यांच्या संयुक्त उपक्रमाने मोकाट कुत्री पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. शनिवार ...

दत्तवाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त सुरू
दत्तवाड, ता. शिरोळ येथे कोल्हापूर महानगरपालिका व पशुसंवर्धन खाते यांच्या संयुक्त उपक्रमाने मोकाट कुत्री पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. शनिवार दुपारपर्यंत ७ मोकाट कुत्र्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांना पकडून जयसिंगपूर येथील तालुका लघु पशू चिकित्सालय येथे नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
याप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर वाय. ये. पठाण यांनी सांगितले की, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तरच त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होऊ शकतो.
दत्तवाड येथे दोन दिवसापूर्वी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका शेत मजूर महिलेचा बळी गेला होता. यामुळे दत्तवाड ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले होते. याची दखल घेऊन स्वाभिमानी परिवर्तन महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य संजय पाटील, प्रियांका चौगुले, सुरेखा सुतार, प्रवीण सुतार यांनी शिरोलच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, तसेच बळी गेलेल्या महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी निवेदन दिले होते. याची दखल घेऊन तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी लगेचच कोल्हापूर व सांगली महानगरपालिका आयुक्त यांना मोकाट कुत्रे पकडण्यासाठी त्वरित पथक पाठवण्याचे आग्रह धरले. याची दखल घेऊन कोल्हापूर महानगरपालिका व पशुसंवर्धन खाते यांचे पथक दतवाड येथे सकाळी लवकरच दाखल झाले व मोकाट कुत्रे पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. ७ कुत्र्यांना जेरबंद केले असले तरी अद्याप मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे गावातील चौका-चौकात तसेच गावाशेजारील शेतात ठाण मांडून असल्याने या सर्वांना पकडेपर्यंत ही मोहीम सुरूच ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. याप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ये. पठाण ,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद पवार, पशुधन विकास अधिकारी डॉ. कुरुंदवाडे, प्रशासक इस्माईल गवंडी, ग्रामसेवक डी.आर. कांबळे, महानगरपालिका व पशुसंवर्धन खात्याचे कर्मचारी, नूतन ग्रा.प. सदस्य आदीसह ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते.