मोबाईल कंपन्यांना कोट्यवधीचा चुना

By Admin | Updated: January 25, 2015 01:08 IST2015-01-25T01:03:47+5:302015-01-25T01:08:11+5:30

दोघांना अटक : आंतरराष्ट्रीय कॉलचे बेकायदा लोकल कॉलमध्ये रूपांतर; मोठे रॅकेट शक्य

Mobile companies chose billions of crores | मोबाईल कंपन्यांना कोट्यवधीचा चुना

मोबाईल कंपन्यांना कोट्यवधीचा चुना

इचलकरंजी : आंतरराष्ट्रीय कॉलचे लोकल कॉलमध्ये बेकायदा रूपांतर करून भारत सरकार व खासगी मोबाईल कंपन्यांची सुमारे दोन कोटींची फसवणूक करणारे रॅकेट इचलकरंजीत उघडकीस आले आहे. याप्रकरणी संजय जयपाल कागवाडे (वय ४०, रा. जनता चौक, इचलकरंजी) व सयाजी रघुनाथ माने (३८, रा. शिरोळ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अशाप्रकारे फसवणूक करणारे रॅकेट असण्याची शक्यता असून, या दोघांनी ही मशीन ज्याच्याकडून घेतली, तो फरार झाल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या कारवाईमध्ये पोलिसांनी विविध कंपन्यांचे ३२ सीमकार्ड, संगणक, इंटरनेट मोडेम व चायना मेड मशिनरी असे सुमारे तीन लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करत चायना मेड मशिनरी वापरून संजय हा आंतरराष्ट्रीय कॉल्सचे व्हीओआयपीच्या माध्यमातून इंटरनेटवर व सीमबॉक्स यांच्या साहाय्याने त्यांचे आयडेंटी बदलून त्याचे लोकल कॉलमध्ये रूपांतर करून अनधिकृत सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देत होता. त्यासाठी लागणारे सीमकार्ड स्वत:च्या नावे खरेदी करून सयाजी माने हा त्याला साहाय्य करीत होता. दोघांनीही पैसे मिळविण्यासाठी हे कृत्य केल्याचे कबूल केले असून, त्यांनी ही सर्व मशिनरी कोणाकडून खरेदी केली, या पाठीमागे आणखीन कोणी मास्टर मार्इंडचा सहभाग आहे काय. त्याचबरोबर अन्य कोणकोणत्या ठिकाणी अशा स्वरूपाची मशिनरी वापरून अनधिकृत काम सुरू आहे का, याचा तपास सुरू असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.
दरम्यान, संजयने ज्याच्याकडून या मशिनरी घेतल्या, त्याला कारवाईची कुणकुण लागल्याने तो पसार झाला. त्यामुळे तो सापडल्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होईल. आंतरराष्ट्रीय कॉलची छेडछाड होत असल्याची राष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन विभागाला माहिती मिळाल्याने सिग्नलच्या साहाय्याने येथील जनता बॅँक परिसरातील एका साडी सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या या अनधिकृत केंद्रावर काल, शुक्रवारी दुपारी पथकाने छापा टाकला. यामध्ये संजयने डीनस्टार कंपनीच्या सीमबॉक्समधून आयडियाचे इंटरनेट कनेक्शन जोडून त्यामध्ये व्होडाफोन, डोकोमो, रिलायन्स अशा कंपन्यांचे ३२ सीमकार्ड वापरून आंतरराष्ट्रीय कॉलचे लोकल कॉलमध्ये रूपांतर करत असल्याचे दिसून आले. पथकाने त्याला रंगेहात पकडून तेथील सर्व मशिनरी जप्त केली. हे काम संजय राहत्या घरीच करत असल्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांची पोलिसांनी काल,शुक्रवारी दिवसभर कसून चौकशी केली. त्यानंतर संजय व त्याला सीमकार्ड आणून देणारा सयाजी या दोघांवर गावभाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. भारत सरकार व विविध खासगी कंपन्यांचे यामध्ये प्रथमदर्शनी २ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढल्यास या फसवणुकीचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दोघांवर माहिती व तंत्रज्ञानाचा गैरवापर, फसवणूक, संगनमत व इंडियन टेलिग्रॅम अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल केले आहेत. पथकामध्ये टेलिकम्युनिकेशन विभागाचे डीओटी टर्म विंगचे उपमहानिदेशक अशोक मोहबे, सहायक महानिदेशक अमित रस्तोगी, सहायक निदेशक सुरेश गोपीनाथ मेनन, बळिराम बावस्कर यांच्यासह कोल्हापूर व स्थानिक पोलिसांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: Mobile companies chose billions of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.