कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीष आनंदा फोंडे यांना शुक्रवारी प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात फोंडे यांनी जनआंदोलन उभे केले आहे. फोंडे यांचा आवाज बंद करण्यासाठी सरकारने सूडबुद्धीने केलेली ही कारवाई म्हणजे हुकूमशाहीचे लक्षण आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकांनी कोणताही खुलासा न घेता फोंडे यांच्यावर कारवाई केली. त्यामुळे कोल्हापुरातील लोक हे जर्मनी व इटलीतील निरंकुश हुकूमशाही अनुभवत असल्याची भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केली. गिरीश फोंडे यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठापासून ते जगातील कानाकोपऱ्यात विद्यार्थी युवक चळवळीचे नेतृत्व केले आहे. पन्नासहून अधिक गावांमध्ये त्यांनी दारूबंदी केली आहे. शाळा वाचवण्यासाठी व विद्यार्थी, शिक्षकांच्या हक्कासाठी ते अग्रेसर राहिले आहेत.पर्यावरण चळवळीत सक्रिय आहेत. जातीअंतासाठी त्यांनी आंतरजातीय चळवळ उभी केली आहे. अशा व्यक्तीविरोधात सरकार सूड बुद्धीने कारवाई करत असेल तर ते निषेधार्थ आहे. अशा कितीही कारवाया केल्या तरी जनतेच्या मनातील आवाज सरकारला बंद करता येणार नाही. कोल्हापूरची जनता फोंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ही लढाई लढेल, अशा शब्दात आमदार पाटील यांनी फोंडे यांच्यावर झालेल्या कारवाईचा जाहीर निषेध केला.
चळवळ मोडण्याचा प्रयत्न : राजू शेट्टीगिरीष फोंडे यांच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याला सरकारच्या विरोधात बोलले म्हणून निलंबित केले जाते. यावरून राज्याच्या राजकारणाची पातळी किती घसरली आहे, हे दिसते. फोंडेंना निलंबित करून चळवळ मोडण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांचा असून सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर सामान्य माणूस त्यांना भर चौकात तुडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकातून दिला.शेट्टी म्हणाले, सरकारच्या विरोधात बाेलले म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फोंडे यांची सहायक शिक्षक पदावरून तडकाफडकी निलंबन केले. राज्यकर्ते किती षंड झालेले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात राज्यकर्त्यांनी अशा पद्धतीने चळवळी संपविण्यासाठीच काम त्यांनी केले तर आम्ही त्याविरोधात लढत राहू. सत्तेच्या जीवावर अतिरेक करून ज्या भानगडी व कारनामे करत आहात, हे जनतेला माहिती आहे. शक्तिपीठ महामार्गातून ५० हजार कोटी हाणण्याचा डाव राज्यकर्त्यांचा आहे. त्यांची सत्ता जाईल, त्यावेळी हीच जनता भर चौकात पायाखाली तुडवायला मागे-पुढे बघणार नाही, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.