लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संघर्ष व क्रांतीच्या वाटेवरची लाड यांच्या घराण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे. यश-अपयशाची पर्वा न करता लढत राहण्याच्या वृत्तीने तब्बल ५८ वर्षांनंतर त्यांच्या घरात पुन्हा आमदारकीने प्रवेश केला.
स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकार चळवळीचे सेनापती व तुफान सेनेचे फिल्ड मार्शल क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांनी स्वातंत्र्योत्तर काळातही राजकारणातील लढवय्येपणा कायम ठेवला. त्यावेळच्या बॉम्बे प्रांतात असलेल्या तासगाव विधानसभा निवडणुकीत जी. डी. बापूंनी शेतकरी व कामगार पक्षाच्या माध्यमातून (पीडब्ल्यूपी) लढा दिला. काँग्रेसचे दत्ताजीराव भाऊराव सूर्यवंशी यांचा त्यांनी पराभव करून आमदारकी मिळविली. त्यानंतर पुन्हा त्यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर १९६२ मध्ये तासगावमधून निवडणूक लढविली. त्यात काँग्रेसचे धोंडिराम यशवंत पाटील यांनी त्यांचा पराभव केला.
पराभवानंतर तत्कालीन शेतकरी कामगार पक्षाने त्यांना १९६२ मध्येच विधान परिषदेवर संधी दिली. त्यानंतरही सातत्याने ते लढत राहिले. त्यांनी भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघातून १९७८ आणि १९९० मध्ये निवडणूक लढविली. एकदा संपतराव चव्हाण यांच्याकडून, तर दुसऱ्या वेळी डॉ. पतंगराव कदम यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
जी. डी. बापू लाड यांनी त्यानंतर सामाजिक कार्यात वाहून घेतले. त्यांचे पुत्र अरुण लाड यांनी २००५ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अनेकदा राजकारणात उमेदवारीसाठी संघर्ष केला. २०१४ मध्ये त्यांनी पुणे पदवीधरची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती; मात्र त्यांना अपयश आले. आता २०२० च्या निवडणुकीत त्यांना यश मिळाल्यानंतर तब्बल ५८ वर्षांनंतर त्यांच्या घराने आमदारकी खेचली.
-------------------------------------------------
जी. डी. बापू लाड यांच्या लढती
वर्ष उमेदवार पडलेली मते टक्के निकाल
१९५७ गणपती दादा लाड (शेकाप) २४७३६ ५६.१३ विजयी
दत्ताजीराव भाऊराव सूर्यवंशी (काँग्रेस) १९३३२ ४३.८६ पराभूत
१९६२ धोंडिराम यशवंत पाटील (काँग्रेस) ३३०८९ ६२ विजयी
गणपती दादा लाड (शेकाप) १८९३२ ३५.४७ पराभूत
१९७८ संपतराव अण्णासाहेब चव्हाण (काँग्रेस) ४३१४९ ५२.१९ विजयी
गणपती दादा लाड (शेकाप) २१०९७ २५.३६ पराभूत
१९९० पतंगराव कदम ६४६६५ ५५.१७ विजयी
गणपती दादा लाड (सीपीआय) ४९७३८ ४२.४४ पराभूत