शिष्यवृत्तीचे ११ लाख तीन महिन्यांपासून ‘गायब’
By Admin | Updated: July 16, 2015 01:00 IST2015-07-16T01:00:14+5:302015-07-16T01:00:14+5:30
‘समाजकल्याण’चा शोध सुरू : मागासवर्गीय मुले-मुली वंचित; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा घोळ

शिष्यवृत्तीचे ११ लाख तीन महिन्यांपासून ‘गायब’
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर मागासवर्गीय व अनुसूचित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या १ कोटी ८६ लाख ३० हजार रुपयांपैकी दहा लाख ९२ हजार ८५० रुपये तीन महिन्यांपासून ‘बेपत्ता’ आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या संबंधित खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यासाठी जिल्हा बँकेत धनादेशाद्वारे २७ एप्रिल २०१५ रोजी पैसे भरले आहेत. जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ
सदस्य हिंदुराव चौगले यांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नसल्याचे समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या बुधवारी पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर समाजकल्याण प्रशासन जिल्हा बँकेत भरलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेचा पत्ता शोधण्यास सुरुवात
केली. शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून प्रत्येक शैक्षणिक वर्षात पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जाती अशा प्रत्येक विद्यार्थिनीस ६०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. आठवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थिनीसही ६०० रुपये मिळतात. याशिवाय नववी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या अनुसूचित जमातीची मुले आणि मुली यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती म्हणून एक हजार रुपये मिळतात. समाजातील मागास घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज प्रत्येक वर्षी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन भरून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले जाते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे गेल्या शैक्षणिक वर्षात अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. परिणामी, यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिष्यवृत्ती वेळेत न मिळण्यावर वादळी चर्चा झाली आहे. तांत्रिक अडचणीतून मार्ग काढत गेल्या शैक्षणिक
वर्षातील जिल्ह्णातील २५ हजार ८३९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची मंजुरी मिळाली.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘झळ’
शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटला तरी सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. शिक्षकांनी संबंधित पालकांना शिष्यवृत्ती मंजूर झाल्याचे सांगितले आहे; पण खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा नाही. जिल्हा बँकेच्या शाखेत जाऊन पालक विचारणा करीत आहेत; पण ‘रक्कम जमा झालेली नाही’ असे त्रोटक उत्तर मिळत आहे. दोष कोणाचाही असला तरी ‘झळ’ मात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बसत आहे.
शिष्यवृत्तीची रक्कम एप्रिल महिन्यात जिल्हा बँकेत भरली आहे. पात्र सर्व विद्यार्थ्यांना ती मिळालेली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा बँकेत चौकशीसाठी कर्मचाऱ्यास पाठविले. नेमकी कोठे अडचण आहे, याची माहिती घेत आहोत.
- सुंदरसिंह वसावे, समाजकल्याण अधिकारी
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. तीन महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेत पैसे जमा करूनही शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नसतील तर गंभीर बाब आहे.
- हिंदुराव चौगले, सदस्य, जिल्हा परिषद
जिल्हा परिषदेने शिष्यवृत्तीसाठीची १ कोटी ८६ लाख ३० हजार रुपये जिल्हा बँकेत भरले आहेत. त्यापैकी २४ हजार ३६० विद्यार्थ्यांचे १ कोटी ७५ लाख ३७ हजार १५० रुपये संबंधित खात्यांवर जमा केले आहेत. उर्वरित १४७९ विद्यार्थ्यांचे खाते क्रमांक चुकीचे असल्याने अडचण आली आहे.
- प्रतापसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक