कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करुनही राज्य सरकार दखल घेत नसेल तर अशा असंवेदनशील सरकारला घेरण्यासाठी राज्यात एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही. मंत्र्यांचे जिथे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांना आडवले जाईल. असा इशारा देत २५ नोव्हेंबर पासून राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शेट्टी म्हणाले, गेल्या हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपये द्या, एकरकमी एफआरपीच्या कायद्यात केलेला बदल रद्द करा, वजन काटे डिजीटल करा आदी मागण्यांसाठी दोन दिवस ऊस तोड बंद आंदोलन केले. मात्र असंवेदनशील राज्य सरकारने चर्चेलाही बोलावले नाही. ‘स्वाभिमानी’ ने पंजा मारला नाही म्हणून कोणी आम्हाला वाघ समजत नसेल तर आम्ही वाघ आहे की शेळी हे दाखवून देऊ. आज पासून राज्यभर मंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन त्यांना रोखले जाईल. त्याचबरोबर २५ नोव्हेंबरला राष्ट्रीय व राज्य मार्ग रोखून शेतकऱ्यांचा हिसका दाखवून देऊ.राज्य सरकारला खोके मिळालेत का?एफ. आर. पी. चा कायदा रद्द करू नका म्हणून राज्यातील साखर सम्राटाकडून राज्य सरकारला ५० खोके मिळाले आहेत काय ? असा सवालही शेट्टी यांनी यावेळी केला. संजय राऊत यांच्याकडे पाच लाख सापडल्यावर त्यांना आत टाकणारी ईडी वर्षाला ४५०० कोटीचा दरोडा टाकणाऱ्या साखर सम्राटांना आत टाकणार का ? असाही सवाल केला.
मंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही, राजू शेट्टी कडाडले; २५ नोव्हेंबरला राज्यभर चक्काजाम
By राजाराम लोंढे | Updated: November 18, 2022 17:42 IST