ओमकार पतसंस्थेत अडकल्या कोट्यवधीच्या ठेवी

By Admin | Updated: April 10, 2015 23:43 IST2015-04-10T23:16:39+5:302015-04-10T23:43:24+5:30

कर्जवसुली ठप्प : ठेवीदारांची जिल्हा उपनिबंधकांकडे धाव

Millions of deposits deposited in Omkar Credit Society | ओमकार पतसंस्थेत अडकल्या कोट्यवधीच्या ठेवी

ओमकार पतसंस्थेत अडकल्या कोट्यवधीच्या ठेवी

कोपार्डे : कोल्हापुरातील महाराणा प्रताप चौकात असलेल्या ओमकार लघुउद्योजक नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहेत. ठेवींची मुदत संपून पाच-दहा वर्षे झाल्याने दामदुप्पट राहू दे, निदान मुद्दल तरी मिळावी, अशी भावना ठेवीदारांत आहे. या ठेवी साधारणत: २००६ पूर्वीच्या असून, ठेवीदारांनी रकमेसाठी सहकार उपनिबंधकांकडे धाव घेतली आहे. संस्थेत सध्या चार कोटींच्या आसपास ठेवी आहेत.
जिल्ह्याच्या मातब्बर नेत्याच्या आशीर्वादाने जून १९८८ मध्ये संस्थेची स्थापना झाली आहे. आकर्षक व्याजदर व नेत्यावरील प्रेम यामुळे अनेकांनी लाखोंच्या ठेवी ओमकार पतसंस्थेत ठेवल्या आहेत. कर्ज वाटपात संचालक मंडळाची मनमानी, वसुलीची यंत्रणा सक्षम नसणे, नियम व अटींना हरताळ यामुळे पतसंस्था अडचणीत आली आहे. या पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाबरोबरच इस्पूर्ली, बीडशेड, भोगावती, परिते येथील शाखांना कुलूप लागल्याने आपल्या ठेवी कुणाकडे मागायच्या, हा प्रश्न ठेवीदारांसमोर आहे.
ओमकार पतसंस्थेने आकर्षक व्याजदर योजना राबवून ग्रामीण भागात इस्पूर्ली, भोगावती कारखाना, बीडशेड येथे शाखा स्थापन केल्या. या पतसंस्थेत जिल्ह्यातील एका मातब्बर राजकीय नेत्याची प्रतिमा लावल्याने त्यांचा प्रभाव असणाऱ्या भागातील शाखांमध्ये लोकांनी लाखाच्या पटीत आपल्या ठेवी ठेवल्या. मात्र, संस्थेच्या संचालकांनी कर्ज वाटप करताना कर्जदाराची परतफेडीची कुवत आहे की नाही हे न पाहता तसेच ठेवीच्या व भागभांडवलाच्या प्रमाणात कर्जे वाटप करण्याच्या नियम व अटींना वाटाण्याच्या अक्षता लावल्याने पतसंस्थेची आर्थिक स्थिती धोक्यात आली.
ही पतसंस्था २००७ पासून ठेवीदारांना मुदत संपलेल्या ठेवींची मुद्दलही देऊ शकलेली नाही. या संस्थेतील ठेवीदार हे सर्वसामान्य शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार, व्यापारी आहेत. ठेवी न मिळाल्याने काही ठेवीदारांनी सहकार उपनिबंधकांकडे या पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करून आमच्या ठेवी परत कराव्यात, यासाठी निवेदन दिले आहे. पतसंस्थेच्या तत्कालीन अध्यक्षांचे निधन झाले असून, नाममात्र असलेल्या संचालक मंडळामध्ये आता कुंडलिक महादेव नारकर हे अध्यक्ष आहेत, तर येथील जनरल मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी आपल्या उदरनिर्वाहाचा वेगळा मार्ग पत्करला आहे. (वार्ताहर)

गाडेगोंडवाडी (ता. करवीर) येथील ठेवीदार महादेव गणपती खाडे यांनी ओमकार पतसंस्थेत नऊ लाख रुपये गुंतवले होते. २००६-०७ ला या ठेवीची मुदत संपली असून, पतसंस्थेकडून त्यांना १८ लाख रुपये येणे आहेत; पण पतसंस्थाच बंद पडल्याने महादेव खाडे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ठेवीसाठी आरे येथील मॅनेजर जनार्दन निकारगे यांच्या घरी ते दिवसातून अनेक वेळा जातात. आरे पैकी धनगरवाडा येथील बाजीराव गावडे यांनी घरबांधणीसाठी जमीन विकली. काही पैसे ओमकार पतसंस्थेत ठेवले; पण ते न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केली.



कर्जवसुलीसाठी कर्जदारावर १०१ कलमाखाली कारवाईचे निर्देश निबंधक कार्यालयाकडून देण्यात आले. मात्र, कर्जदार हे मोठ्याप्रमाणात संचालकांचे नातेवाईक असल्याने या कर्जवसुलीला चालनाच मिळेना, असे ठेवीदारांतून
सांगण्यात येत
आहे.


माझ्याकडे ओमकार पतसंस्थेतील ठेवीदारांचे निवेदन आले आहे. याबाबत संबंधित कार्यालयाला चौकशीचे आदेश देऊन ठेवीदारांना संरक्षण देऊ.
- सुनील शिपूरकर, जिल्हा उपनिबंधक.

या संस्थेत तीन लाख रुपये ठेव ठेवली आहे; मात्र व्याज राहू दे, मुद्दलही मिळेनाशी झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
- विलास जगताप, ठेवीदार, कोपार्डे,
ता. करवीर


माझी व माझ्या घरच्यांची मिळून ५० ते ६० हजार रुपये ठेव ठेवली आहे. आमच्या गावचा कर्मचारी येथे होता. तोही आता याची जबाबदारी झटकत आहे.
- भीमराव दादू पाटील, ठेवीदार - वाकरे,
ता. करवीर.

Web Title: Millions of deposits deposited in Omkar Credit Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.