Middle finger ink instead of left-handed index in polls: Collector | पोट निवडणुकीत डाव्या हाताच्या तर्जनी ऐवजी मधल्या बोटाला शाई: जिल्हाधिकारी

पोट निवडणुकीत डाव्या हाताच्या तर्जनी ऐवजी मधल्या बोटाला शाई: जिल्हाधिकारी

ठळक मुद्दे पोट निवडणुकीत डाव्या हाताच्या तर्जनी ऐवजी मधल्या बोटाला शाई: जिल्हाधिकारी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा निर्णय

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या दत्तवाड(ता.शिरोळ) या मतदारसंघासाठी १२ डिसेंबरला तर चंदगड, हातकणंगले, शिरोळ, करवीर, पन्हाळा तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी उद्या, रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या दिवशी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनी ऐवजी मधल्या बोटाला शाई लावण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी येथे दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रामध्ये लोकसभा, विधानसभेची, स्थानिक स्वराज्य संस्थेची किंवा अन्य निवडणूक नुकतीच पार पडलेली असेल व मतदान केलेल्या मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर न मिटणाऱ्या शाईची निशाणी मिटलेली नसेल, त्यावेळी त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक, पोटनिवडणुकीमध्ये मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी मधल्या बोटाला शाई लावण्यात यावी.

जर मधल्या बोटालादेखील शाईची निशाणी असेल तर जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त यांनी निवडणुकीमध्ये मतदाराच्या कोणत्या बोटाला शाई लावण्यात येईल याबाबत आदेश काढावेत. त्यानुसार स्पष्ट सूचना संबंधित सर्व मतदान केंद्राध्यक्षांना द्याव्यात, असे निवडणूक आयोगाच्या आदेशात नमूद केले आहे.

याबाबत निवडणुकीसाठी कार्यरत असणाºया मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी व कर्मचारी यांनांही प्रशिक्षण दिवशी लेखी सूचना द्याव्यात असे सांगण्यात आले आहे, त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.
 

 

Web Title:  Middle finger ink instead of left-handed index in polls: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.