१८६ कोटींचा १०० एकरचा प्लॉट ‘एमआयडीसी’ने घेतला ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 04:09 IST2020-03-15T04:08:48+5:302020-03-15T04:09:00+5:30
सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत १८६ कोटी रुपये आहे. गेल्या १० वर्षांपासून कंपनीने याचा वापर केलेला नाही.

१८६ कोटींचा १०० एकरचा प्लॉट ‘एमआयडीसी’ने घेतला ताब्यात
- प्रवीण देसाई
कोल्हापूर : टेक्स्टाईल उद्योगासाठी बॉम्बे रेयॉन कंपनीला कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतमींमध्ये दिलेला १०० एकरचा प्लॉट शुक्रवारी ताब्यात घेण्यात आला आहे. सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत १८६ कोटी रुपये आहे. गेल्या १० वर्षांपासून कंपनीने याचा वापर केलेला नाही. ही बाजू महाराष्टÑ औद्योगिक महामंडळाने (एमआयडीसी) उच्च न्यायालयात पुराव्यानिशी मांडल्याने त्यांच्या बाजूने निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे या प्लॉटचे उद्योजकांना पुन्हा वाटप होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित आद्योगिक वसाहतीमध्ये (एमआयडीसी) उद्योगांसाठी जमिनी शिल्लक नाहीत. या प्लॉटवर नवीन आराखडा तयार केला जाणार आहे. १० ते २० गुंठ्यांपर्यंत लहान, मध्यम व मोठे असे प्लॉट पाडले जाणार आहेत. त्यानंतर उद्योजकांना हे प्लॉट वाटप केले जाणार आहेत.
उद्योगासाठी १०० एकरचा प्लॉट देऊनही गेले १० वर्षे त्याचा वापर केला नाही. त्यामुळे न्यायालयीन पातळीवर लढाई लढून हा प्लॉट ‘एमआयडीसी’ ने ताब्यात घेतला आहे. त्याचा आराखडा बनवून उद्योजकांना प्लॉटचे वाटप केले जाईल. -अविनाश सुभेदार, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, ‘एमआयडीसी’