राज्य बाल हक्क आयोगावरील सदस्य बदलणार, शासनाने मागविली नामांकने
By विश्वास पाटील | Updated: January 3, 2025 12:14 IST2025-01-03T12:13:46+5:302025-01-03T12:14:05+5:30
विश्वास पाटील कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची मुदत संपत आल्याने नव्याने अध्यक्ष, सदस्य नियुक्तीची प्रक्रिया शासनाने गुरुवारी ...

राज्य बाल हक्क आयोगावरील सदस्य बदलणार, शासनाने मागविली नामांकने
विश्वास पाटील
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची मुदत संपत आल्याने नव्याने अध्यक्ष, सदस्य नियुक्तीची प्रक्रिया शासनाने गुरुवारी सुरू केली. राज्यात तीन पक्षांचे सरकार सत्तेत आल्याने सर्वच पक्षांकडून यातील सात पदांसाठी मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. अर्ज (नामांकन) सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत आहे.
मावळत्या आयोगाची मुदत २९ एप्रिलपर्यंत संपते. यापूर्वीच्या सदस्यांची घोषणा करणारे राजपत्र २९ एप्रिल २०२२ ला प्रसिद्ध झाले होते. मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या ॲड. सुशीबेन शहा या सध्याच्या अध्यक्षा आहेत. त्यामध्ये ॲड. संजय सेंगर (अकोला), ॲड. जयश्री पालवे (पुणे), ॲड नीलिमा चव्हाण (मुंबई), ॲड. प्रज्ञा खोसरे (बीड), डॉ. सायली पालखेडकर (नाशिक) आणि चैतन्य पुरंदरे (पुणे) हे सहा सदस्य होते. आता त्यांची मुदत संपत असल्याने नव्याने अध्यक्ष व सदस्य निवडीसाठी शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. महिला व बालकल्याण मंत्री निवड समितीच्या अध्यक्षा असतात. त्यामध्ये राज्यमंत्री आणि एक स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी सदस्य असतो.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येताना मंत्रिपदासाठीही तिन्ही पक्षात चांगलीच रस्सीखेच झाली..आता महामंडळे, विविध आयोग अशा महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळण्यासाठी तिन्ही पक्षांचे समर्थक फिल्डिंग लावू शकतात. त्यामुळेच अध्यक्ष, सदस्य पदासाठी जास्त संख्येने अर्ज येण्याची शक्यता आहे.
तीन वर्षे कालावधी..
नियुक्त केलेल्या सदस्यांचा कालावधी तीन वर्षांचा असेल. अध्यक्षांचे वय ६५ पेक्षा कमी असेल. सदस्यांचे वय ६० पर्यंतच राहील. किमान पदवीधर ही शैक्षणिक अर्हता आहे. इच्छुकांनी महिला व बालविकास आयुक्त पुणे यांच्या कार्यालयाकडे अर्ज पाठवायचे आहेत.