जि.प.च्या आजच्या सभेत सदस्यांना प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:03+5:302021-06-01T04:18:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेची आजची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने ...

Members are not allowed in today's meeting of ZP | जि.प.च्या आजच्या सभेत सदस्यांना प्रवेश नाही

जि.प.च्या आजच्या सभेत सदस्यांना प्रवेश नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा परिषदेची आजची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीच तसा आदेश दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही सभागृहामध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.

राजर्षी शाहू सभागृहामध्ये दुपारी १ वाजता ही सभा होणार आहे. अध्यक्ष बजरंग पाटील यांना सोमवारी दुपारी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते त्यांच्या निवासस्थानातून ऑनलाइन कामकाज पाहणार आहेत. उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने, मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण आणि सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई एवढेच जण सभागृहात उपस्थित राहणार आहेत.

सर्व विभागप्रमुख हे त्यांच्या त्यांच्या दालनातून कामकाजात सहभागी होणार आहेत. विरोधी पक्षनेते विजय भोजे यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन विरोधी पक्षाच्या किमान पाच सदस्यांना तरी आत बसू द्यावे, अशी लेखी मागणी केली. याबाबत चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाइन सभेचा आदेश दिला आहे. त्यामुळे सत्तारूढांना एक, विरोधकांना एक असा न्याय करता येणार नाही. पदाधिकारी वगळता कोणालाही सभागृहात प्रवेश नसेल.

चौकट

इतरांची पंचायत समित्यांमध्ये सोय

तालुकास्तरावर पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांसाठी ऑनलाइन यंत्रणेची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

चौकट

वित्त आयोगाच्या साडेनऊ कोटींचा विषय

ऐनवेळच्या विषयात नवव्या क्रमांकाने पंधराव्या वित्त आयोगाच्या आलेल्या बंधित निधी दुसऱ्या हप्त्याचे ६ कोटी तर १० व्या विषयानुसार ३ कोटी ५४ लाख रुपयांच्या निधीचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.यातून कामाचा आराखडा आणि नियोजनासाठी मंजुरी मिळावी यासाठी हा विषय ठेवण्यात आला आहे. कामे ठरली नसली तरी सरसकट मंजुरी घेण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.

चौकट

पदाधिकारी म्हणून शेवटची बैठक

जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची कदाचित ही शेवटची सर्वसाधारण सभा असण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यासाठी पुन्हा उद्या बैठक होणार असून, पहिल्यांदा त्या दिवशीचे राजीनामे होतील, असे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येते.

Web Title: Members are not allowed in today's meeting of ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.