जिंकणाऱ्या पैलवानांचा पक्षांकडून शोध, कोल्हापूर मनपा निवडणुकीसंदर्भात जोरबैठका सुरू

By भारत चव्हाण | Updated: May 9, 2025 17:14 IST2025-05-09T17:12:50+5:302025-05-09T17:14:10+5:30

भारत चव्हाण  कोल्हापूर : चार महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर भाजप, दोन्ही शिवसेना, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी ...

Meetings of all political parties regarding Kolhapur Municipal Corporation elections have begun | जिंकणाऱ्या पैलवानांचा पक्षांकडून शोध, कोल्हापूर मनपा निवडणुकीसंदर्भात जोरबैठका सुरू

जिंकणाऱ्या पैलवानांचा पक्षांकडून शोध, कोल्हापूर मनपा निवडणुकीसंदर्भात जोरबैठका सुरू

भारत चव्हाण 

कोल्हापूर : चार महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर भाजप, दोन्ही शिवसेना, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तसेच त्यांचे नेते यांच्या जोरबैठका सुरू झाल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे, तर भाजपने पाच सदस्यांची समिती नियुक्त करायचे ठरविले आहे. कुस्ती जिंकणाऱ्या पहिलवानांचा सर्वच पक्ष शोध घेत आहेत. 

पक्षांची भाऊगर्दी, मतदारांच्या वाढलेल्या अपेक्षा, यामुळे सारेच घामाघूम होतील, असे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे. भारतीय जनता पक्षातर्फे निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढायची, की महायुती करून लढायचे, पक्षाची तसेच इच्छुक उमेदवारांच्या त्यांच्या प्रभागातील ताकद, लोकसंपर्क, त्याने केलेली कामे, याचा आढावा घेऊन ठोस निर्णय घेण्याकरिता पाच सदस्यांची समिती नियुक्त करायचे ठरविले आहे. समिती दोन- चार दिवसांत जाहीर केली जाईल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा

निवडणुकीच्या तयारीसाठी लवकरच भाजपचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित केला जाणार आहे. मेळाव्यास मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव मार्गदर्शन करणार आहेत. महायुतीचा निर्णय मंत्री पाटील घेणार आहेत.

राष्ट्रवादीच्या २५ उमेदवारांची यादी तयार

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने निवडणुकीची तयारी आधीपासूनच केली आहे. त्यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता असलेल्या २५ उमेदवारांची यादी तयार आहे. त्यामध्ये माजी नगरसेवकांची संख्या अधिक आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत एक बैठक रविवारपर्यंत होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये निवडणुकीची दिशा ठरविली जाईल.

शिवसेनेची १७ मेला मुंबईत बैठक

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची गुरुवारी बैठक झाली. १५ ते २० नगरसेवक निवडून येतील, अशा पद्धतीने तयारी करावी, अशा सूचना प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपनेते अरुण दुधवडकर यांनी दिल्या. महापालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाने विरोधी पक्षनेते भास्कर जाधव यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. महापालिका स्तरावरील माहिती संकलित करण्याचे काम सुरु असून, येत्या १७ मे रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत त्याचा अहवाल सहप्रमुख संजय पवार सादर करणार आहेत.

शरद पवार यांचे स्थानिकांना अधिकार

आघाडी करायची, की स्वतंत्र लढायचे, उमेदवारी कोणाला द्यायची, कोणत्या प्रभागातून लढायचे, याचे सर्व अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर.के. पोवार येत्या आठ दिवसांत पक्षाचा मेळावा घेऊन पुढील दिशा ठरविणार असल्याचे सांगण्यात आले.

शिवसेना शिंदे गट सक्रिय

शिवसेना शिंदे गट सक्रिय झाला असून, आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार केला आहे. सक्षम उमेदवारांची शोधमोहीम पक्षाकडून सुरू झाली आहे. काँग्रेससह अन्य पक्षांतून काही माजी नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्नही शिंदे गटाकडून सुरू झाले आहेत.

काँग्रेसला नाराजीचे ग्रहण

एकीकडे सर्वच पक्षांत निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या असताना काँग्रेस पक्षाला मात्र नाराजीचे ग्रहण लागले आहे. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आमदार सतेज पाटील करीत आहेत. लवकरच एक बैठक आयोजित करून सर्व इच्छुकांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Web Title: Meetings of all political parties regarding Kolhapur Municipal Corporation elections have begun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.