वस्त्रोद्योग आयुक्तांकडून बैठकीची हालचाल
By Admin | Updated: September 3, 2016 00:55 IST2016-09-03T00:39:49+5:302016-09-03T00:55:15+5:30
ऊर्जितावस्थेवर चर्चा होणार : यंत्रमागधारक संघटना, आमदार, खासदारांच्या प्रयत्नांचा परिपाक

वस्त्रोद्योग आयुक्तांकडून बैठकीची हालचाल
राजाराम पाटील-- इचलकरंजी --यंत्रमाग उद्योगातील आर्थिक मंदी व अन्य समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाकडून सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातील यंत्रमाग केंद्र कार्यक्षेत्रातील खासदार व यंत्रमागधारक संघटनांची बैठक मुंबई येथे बोलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. अभूतपूर्व मंदीचे वातावरण असल्याने यंत्रमाग उद्योगास सरकारने ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यावी, या मागणीसाठी संबंधित संघटना, आमदार व खासदार प्रयत्न करीत आहेत. त्याचाच परिपाक म्हणून ही बैठक बोलविण्यात येत आहे.
यंत्रमाग उद्योगामध्ये गेले वर्षहून अधिक काळ अभूतपूर्व मंदीचे सावट आहे. महाराष्ट्रात तेरा लाख यंत्रमाग असल्यामुळे मंदीचा फटका राज्यातील सर्वच यंत्रमाग केंद्रांना बसला आहे. २६ जुलैला इचलकरंजीतील यंत्रमागधारकाने कर्जास कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर यंत्रमागधारकांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते.
यंत्रमाग उद्योगातील मंदीबाबत विचारविनिमय करण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रयत्नाने २२ आॅगस्ट रोजी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीसाठी देशातील यंत्रमाग केंद्राशी निगडित असलेले खासदार व त्याठिकाणी कार्यरत असलेले यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तेव्हा यंत्रमाग उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकार प्रयत्न करेल. मात्र, यंत्रमागांच्या असलेल्या समस्या वेगवेगळ्या असल्यामुळे विभागवार बैठका घेऊन यंत्रमागधारकांच्या समस्या व प्रश्न यांचे निराकरण करण्यात येईल, असे दिल्लीतील बैठकीमध्ये मंत्री इराणी यांनी जाहीर केले होते.
त्याच्यापाठोपाठ २७ आॅगस्टला आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नाने राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी इचलकरंजीत येऊन वस्त्रोद्योग परिषद घेतली. या परिषदेमध्ये देशमुख यांनी यंत्रमागधारकांच्या समस्यांबाबत सरकारला सहानुभूती आहे, असे स्पष्ट करताना ताबडतोबीचा उपाय म्हणून छोट्या यंत्रमागधारकाला एक रुपये प्रतियुनिट वीज दराची सवलत आणि यंत्रमाग कारखान्यासाठी घेतलेल्या कर्जावर पाच टक्के व्याज दराचे अनुदान देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. वीज दर व कर्जावरील व्याज अनुदान याची अंमलबजावणी सरकारकडून त्वरित व्हावी, अशी अपेक्षा यंत्रमागधारकांकडून व्यक्त होत आहे.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री इराणी यांनी दिल्लीतील बैठकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुंबई आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीतील विभागाशी निगडित असलेल्या यंत्रमाग केंद्रातील खासदार व यंत्रमागधारक संघटना यांची सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या बैठकीकडे यंत्रमाग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.