दहा हजार रुपये बैठक भत्ता हवा
By Admin | Updated: December 11, 2014 23:51 IST2014-12-11T22:26:04+5:302014-12-11T23:51:04+5:30
मासिक सभेत ठराव : करवीर पंचायत समिती सदस्यांची मागणी

दहा हजार रुपये बैठक भत्ता हवा
कसबा बावडा : पंचायत समिती सदस्यांना महिन्याला दहा हजार रुपये भत्ता मिळावा, असा ठराव करवीर पंचायतीच्या मासिक सभेत एकमताने करण्यात आला. अध्यक्षस्थानी पूनम जाधव होत्या. सभेत शिक्षण विभागाला चांगलेच धारेवर धरण्यात आले. मतदारसंघातील गावागावांत कामानिमित्त फिरताना सदस्यांना पदरमोड करावी लागते. तसेच फोनचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे समितीकडून महिन्याला मिळणारे १२०० रुपये केव्हाच संपूण जातात. त्यामुळे सदस्यांना किमान महिन्याला दहाहजार रुपये तसेच उपसभापती आणि सभापती यांच्या मानधनातही भरीव वाढ करावी, असा ठराव भुजगोंडा पाटील यांनी मांडला. सदस्यांनी या ठरावाला मंजुरी दिली. शिक्षकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहावे, अशी प्रशासनाने सक्ती करावी, अशी मागणी तानाजी आंग्रे व राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. मुख्यालयाच्या ठिकाणी जर शिक्षक राहत नसेल, तर शिक्षक पगारातून राहण्याचा निधी का घेतात? असा सवालही त्याांनी उपस्थित केला. शिक्षक मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाहीत, त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे, याची पाहणी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. याबाबत शाळांची तपासणी केली जाईल, असे गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी सांगितले. दिलीप टिपुगडे यांनी आंग्रे यांच्या मागणीला विरोध केला. शिक्षक मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे सक्तीचे केल्यास त्यांना ते त्रासदायक ठरणार आहे. आणि तो राहिला, तर गुणवत्ता वाढेलच असे नाही, असे दिलीप टिपुगडे यांनी सूचित केले. स्मिता गवळी यांनी शिक्षक शाळेच्या ठिकाणी वेळेवर कसे येतील याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे नमूद केले. तालुक्यातील रस्त्यांची तसेच कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. एक तासाच्या प्रवासासाठी दोन-तीन तास लागतात. त्यामुळे हा रस्ता चौपदारी करावा, अशी सूचना राजेंद्र सूर्यवंशी यांनी मांडली. नुकत्याच झालेल्या खरीप हंगामात सूर्यफुलाचे बोगस बियाणे विकणाऱ्या दुकानदारांवर काय कारवाई केली, असा प्रश्न आंग्रे, राजेंद्र सूर्यवंशी यांनी उपस्थित केला. तर टिपुगडे यांनी कृषी विभागाकडे कारवाईचे अधिकार नसतील, तर अशा दुकानदारांचा सुळसुळाट वाढणारच असे ते म्हणाले. यावर सभागृहाच्या भावना शासनाला कळवितो, असे कृषी अधिकारी डी. बी. पाटील यांनी सांगितले. हसूर येथील कृषिकेंद्र बीडमध्ये हलवावे, अशी सूचना राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. त्याला उपसभापती दत्तात्रय मुळीक यांनी विरोध केला. उजळाईवाडी अंगणवाडीच्या प्रस्तावाचे काय झाले, असा सवाल अरुणिमा माने यांनी केला. पाचगावचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी स्मिता गवळी यांनी केली. घरकुल योजनांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी सूचना सचिन पाटील यांनी केली. सभेत आरोग्य विभागाचे मात्र कौतुक करण्यात आले. या विभागाने नुकतेच आरोग्य शिबिर घेऊन ते यशस्वी केले. त्यामुळे डॉ. जे. डी. नलवडेंसह सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. जयसिंग काशीद, सरदार मिसाळ, अशोक पाटील, छायाताई माने, आदींनी सभेत विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांची उत्तरे गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव आणि अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी) करवीर पंचायत समितीची मासिक बैठक नेहमी २ वा. सुरू होते. परंतू बुधवारी झालेली बैठक तब्बल ४० मिनिटे उशिरा सुरू झाली. गटविकास अधिकारी आणि विविध विभागाचे प्रमुख सभागृहात सदस्यांची वाट पाहत बसावे लागले.