ताराराणी आघाडी-काँग्रेसमध्येच रंगणार सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:25+5:302021-02-05T07:07:25+5:30
दीपक जाधव कदमवाडी : शहरातील प्रभाग क्रमांक ७, सर्किट हाऊस हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला असून या ...

ताराराणी आघाडी-काँग्रेसमध्येच रंगणार सामना
दीपक जाधव
कदमवाडी : शहरातील प्रभाग क्रमांक ७, सर्किट हाऊस हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला असून या प्रभागात भाजप-ताराराणी आघाडी आणि काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये चुरशीचा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या रणधुमाळीत आतापासूनच या प्रभागात इच्छुकांनी वातावरणनिर्मिती करण्यास सुरुवात केल्याने या प्रभागातील लढत रंगतदार होणार हे निश्चित आहे. या प्रभागावर भाजप-ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम यांचा प्रभाव आहे. त्यामुळे हा प्रभाग आपल्याकडे खेचून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसही नेटाने कामाला लागली असल्याचे चित्र आहे. गत निवडणुकीत या प्रभागातून सत्यजित कदम यांच्या कार्यालयातील उमेश पागर यांच्या पत्नी अर्चना पागर यांना ऐनवेळी रिंगणात उतरविले गेले. पागर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार अन्वरबी शेख यांचा पराभव केला होता. यावेळी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवार अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर होते. यंदा या प्रभागात अनुसूचित जातीचे आरक्षण आले असून इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडून धनाजी चौगुले हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे. आरक्षण जाहीर झाल्यापासून त्यांनी प्रभागात संपर्क वाढवला असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. काँग्रेसकडून महिला काँग्रेसच्या सरचिटणीस उज्ज्वला चौगले यांचे पती राजेंद्र चौगले हे इच्छुक आहेत. उज्ज्वला चौगुले या महिला काँग्रेस, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या माध्यमातून भागातील नागरिकांपर्यंत पोहोचल्या आहेत. गत निवडणुकीत त्यांनी कदमवाडी प्रभागातून काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. युवा उद्योजक श्रीनिवास सोरटे यांनीही या प्रभागातून महापालिकेत जाण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. शक्ती आठवले यांनी या प्रभागात तयारी केली आहे. गत निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकांची मते घेणारी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला रिंगणात उतरविणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवसेनेकडून या प्रभागात उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे. मात्र, भाजप-ताराराणी आघाडीकडून ही जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेनाही जोरदार प्रयत्न करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास या प्रभागात रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे.
सोडवलेले नागरी प्रश्न : भागातील ८० टक्के रस्ते पूर्ण केले, प्रभागात एलईडी दिवे, संपूर्ण प्रभागात
अमृत योजनेची पाईपलाईन ७० टक्के पूर्ण, लालबहादूर शास्त्री उद्यान परिसरात अंतर्गत विद्युत वाहिनी, शाहू काॅलनी काँक्रिटीकरण,
मुस्लिम दफनभूमी नूतनीकरण.
रखडलेले प्रश्न :
भागातील अंतर्गत रस्ते अपूर्ण, गटर्सची कामे अर्धवट,
पाणीपुरवठा कमी दाबाने,
कोट : प्रभागातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून काही ठिकाणी अंतर्गत रस्ते करायचे बाकी आहेत. भागातील ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
अर्चना पागर, नगरसेविका
गत निवडणुकीतील प्रमुख उमेदवार : अर्चना पागर १४९९ (ताराराणी), अन्वरबी शेख ११०६ (राष्ट्रवादी), ॲड. उमा सूर्यवंशी ४५० (काँग्रेस), संध्या पागर १६२(शिवसेना)...
फोटो २९ प्रभाग क्रमांक ७
सर्किट हाऊस प्रभागातील पिरजादे पार्कमधील अंतर्गत रस्ता अपूर्ण असून ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावा लागत आहे.