सामाजिक कार्यात अग्रेसर ‘मारवाडी’

By Admin | Updated: March 16, 2015 00:05 IST2015-03-15T23:24:40+5:302015-03-16T00:05:23+5:30

कोल्हापुरात दीडशे वर्षांपासून वास्तव्य : छत्रपती शाहू महाराजांकडून राजस्थानी सराफी कारागिरांचे पाचारण

'Marwadi' ahead of social work | सामाजिक कार्यात अग्रेसर ‘मारवाडी’

सामाजिक कार्यात अग्रेसर ‘मारवाडी’

भारत चव्हाण - कोल्हापूर
मारवाडी समाजाला त्यांच्या व्यवसायातील सचोटीमुळे एकेकाळी कंजूषपणाची उपमा दिली जायची. त्यावरूनच पुढे कंजूष मारवाडी, चिक्कू मारवाडी हे शब्द प्रचलित झाले; परंतु व्यवसायातील चिकाटी, एकमेकांना सहकार्य करण्याची आणि आपल्याला मिळालेल्या उत्पन्नातील ठरावीक रक्कम गरीब, गरजू व मुक्या प्राण्यांच्या पालनपोषणावर खर्च करण्याच्या दानशूर वृत्तीद्वारे समाजाने कंजूषपणाची छाया पुसून टाकली. आपद्ग्रस्तांना मदत करण्याचा प्रसंग असो की गोरगरीब, गरजू लोकांना मदत करण्याचा प्रसंग असो; हाच समाज सदैव आघाडीवर राहिला आहे. कोल्हापुरातील मारवाडी समाजाने हा वारसा गेल्या अनेक वर्षांपासून जपला आहे. ‘जहॉँ न जाए बैलगाडी, वहॉँ जाए मारवाडी’ असं मारवाडी समाजाच्याबाबतीत म्हटले जाते. व्यवसायाच्या निमित्ताने हा समाज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. साधारणपणे दीडशे वर्षांपूर्वी समाजातील काही लोक कोल्हापूर शहरात वास्तव्यास आले. सोन्या-चांदीचे दागिने तयार करणाऱ्या मशहूर सराफी कारागिरांना छत्रपती शाहू महाराजांनी राजस्थानहून कोल्हापुरात आणले. त्यांच्यातील कलेला प्रोत्साहन दिले. तत्कालीन कुटुंबांची चौथी, पाचवी पिढी येथे आता कार्यरत आहे. मुळात कष्टाळू, धार्मिक असलेला हा समाज आता कोल्हापूरच्या समाजजीवनाशी एकरूप झाला असून, सुमारे साडेतीन हजार कुटुंबे कोल्हापूरचा अविभाज्य भाग बनली आहेत. अन्य समाजांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. धार्मिक, व्यावसायिक, दानशूर, परोपकारी अशा गुणांनी या समाजाने कोल्हापूरकरांशी जवळीक साधली आहे.

धार्मिक वातावरणाशी जोडलेला समाज
राजस्थानी म्हणजेच मारवाडी समाज होय. तो धार्मिकतेशी जोडला गेला आहे. आपला व्यवसाय आणि आपले कुटुंब यापलीक डे जाऊन समाज म्हणून एकत्र येण्याचे सर्वमान्य ठिकाण म्हणजे भगवान महावीरांचं मंदिर हे आहे. समाजाला एकत्र जोडण्याची आणि धार्मिकता आणि आपली संस्कृती जोपासण्यासाठी मंदिरांची स्थापना करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरात पाच मोठी मंदिरं आहेत. संभवनाथ मंदिर ट्रस्ट, गुजरी (अध्यक्ष - नरेंद्र अमिचंद ओसवाल), लक्ष्मीपुरी मंदिर ट्रस्ट, लक्ष्मीपुरी (अध्यक्ष - कांतीलाल गुलाबचंद ओसवाल), भक्तिपूजानगर मंदिर ट्रस्ट (अध्यक्ष - ललित गांधी), महावीरनगर मंदिर ट्रस्ट (अध्यक्ष - लीलाचंद मूलचंद ओसवाल) व सीमंधर स्वामी मंदिर ट्रस्ट, शिरोली (अमर गांधी) ही ती मंदिरे आहेत. या मंदिरांत दैनंदिन पूजाअर्चा, आरती होत असते. या धार्मिक कार्यक्रमांत समाजातील लोक श्रद्धेने सहभागी होतात.


वर्षभरातील महत्त्वाचे सण
या समाजात अनेक सण, व्रतवैकल्ये केली जातात. पर्यूषण महापर्व (क्षमापण पर्व) व ओळी हे महत्त्वाचे सण आहेत. चातुर्मासात उपवास केले जातात. महावीर जन्मकल्याणक (जयंती) सण म्हणूनच साजरी केली जाते. चोवीस तीर्थंकरांच्या कल्याणकाच्या दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सर्व कार्यक्रमांत समाजातील लोक सहकुटुंब सहभागी होतात. समाजातील महिलावर्ग अत्यंत कडक उपवास व व्रत करतो.
शैक्षणिक कार्यात अग्रेसर
कोल्हापूर शहरात महावीर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चेअरमन ललित गांधी यांनी शैक्षणिक कार्य हाती घेतले आहे. मारवाडी समाजातील ही एकमेव शैक्षणिक संस्था आहे. महावीर इंग्लिश स्कू ल, ब्लॉसम, गोल्डन शॉवर, सह्याद्री पब्लिक स्कूल तसेच केर्ली येथील दोन शाळांतून सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केर्लीच्या शाळेत तर गरीब मुलांनी कपडे व शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते.



व्यवसायाचा विस्तार
कोल्हापूर जिल्ह्यात साधारणपणे साडेतीन हजार मारवाडी जैन समाजाची कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांपैकी ८०० ते ९०० कुटुंबे ही कोल्हापूर शहरात राहतात. या समाजातील लोकांचा व्यवसाय हा प्रामुख्याने सराफी असला तरी अलीकडील काळात काहीजण व्यापार, भांडी व कापड उद्योग, बांधकाम व्यवसाय, कारखानदारीकडेही वळलेला आहे. काहीजण ट्रेडिंगमध्येही उतरले आहेत. आपल्या व्यवसायाचा चोख हिशेब ठेवणे हा या समाजाचा चांगला गुण आहे.
संस्काराला सर्वाधिक प्राधान्य
आपल्या मुलांवर चांगले संस्कार निर्माण करण्याला मारवाडी समाजात सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे लहान वयातच मुलांना मंदिरात नेले जाते. धार्मिक प्रवचनासारख्या कार्यक्रमांत त्यांना सहभागी करून घेतले जाते. मंदिरातच छोट्या मुलांसाठी पाठशाला असतात. तेथे संस्कारांचे व धार्मिक शिक्षण दिले जाते. लहान वयातच जे संस्कार होतात, तेच पुढे कायम राहतात; म्हणूनच मुलांना त्यांचे पालक अशा कार्याला प्राधान्य देतात.


मारवाडी समाजातील प्रतिष्ठित घराणी
कोल्हापुरात मारवाडी जैन समाजातील काही प्रमुख घराणी आहेत. त्यांच्या नावांचा आदरयुक्त दबदबा आहे. या घराण्यांना अनेक वर्षांचा इतिहास व परंपरा लाभलेली आहे. त्यागी, परोपकारी, धार्मिक, यशस्वी व्यावसायिक, दानशूर अशा सर्वार्थांनी या घराण्यांचा उज्ज्वल इतिहास आहे. या घराण्यातील तिसरी, चौथी पिढी कोल्हापुरात आपला वारसा चालवीत आहे. त्यांपैकी प्रमुख घराणी पुढीलप्रमाणे आहेत :
शेलाजी वनाजी संघवी
असलज दरगाजी निंबजीया
हुकमीचंद डुंगाजी राठोड
जोधाजी माशिंगजी परमार
साकलचंद दोलाजी गांधी
हिंदुमल जितराज राठोड

कमी खर्चात वैद्यकीय सेवा
मोफत दिले म्हणायचे नाही म्हणून अगदी नाममात्र म्हणजे पाच व दहा रुपयांत औषधोपचार करण्यासाठी दोन संस्था पुढे आल्या आहेत. विनोद ओसवाल अध्यक्ष असलेल्या भगवान महावीर सेवाधाम ट्रस्ट, गुजरी संस्थेतर्फे पाच रुपयांत सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार केले जातात. एक्स-रे, ईसीजी केवळ पाच रुपयांत काढले जातात. रुग्णांना व्हीलचेअर, वॉकर, बेड पुरविले जातात. ‘बीपीएल’च्या रु ग्णांची मोतीबिंदू आॅपरेशन्स केली जातात. संस्थेच्यावतीने लवकरच तीन कोटी रुपये खर्चून सात हजार स्क्वेअर फुटांच्या जागेत एक सुसज्ज व अत्याधुनिक सेवा देणारे हाॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. आॅपरेशन थिएटरसह एमआरआय, सीटी स्कॅन करण्याची सोय तेथे असणार आहे. महावीरनगर येथे गेल्या दहा वर्षांपासून भगवान महावीर मानवसेवा उपचार केंद्र चालविले जाते. त्याचे अध्यक्ष रमेश जैन आहेत. या केंद्राद्वारे केवळ दहा रुपये तपासणी शुल्कामध्ये वैद्यकीय उपचार केले जातात. या संस्थेची स्वतंत्र हॉस्पिटल बांधण्याची तयारी सुरू आहे.

सामाजिक क्षेत्रातील योगदान
सामाजिक क्षेत्रात या समाजाचे योगदान मोठे आहे. दुष्काळ असो की, महापूर असो; संकटकाळी मदत पोहोचविण्यात या समाजाचा हातखंडा आहे. उत्तराखंड व काश्मीरमधील जलप्रलयावेळी या समाजाने कोल्हापुरातून मोठी मदत केली. मारवाडी युवा मंच व ग्लोबल मारवाडी चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने तीन कोटी रुपये खर्चून फिरते कॅन्सर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरवर सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या तपासण्या केल्या जातात. १३ नोव्हेंबरपासून आतापर्यंत चार महिन्यांत राज्यात ठिकठिकाणी ३६ शिबिरे घेऊन ६८०० महिलांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ८३ महिलांना कॅन्सर असल्याचे निदर्शनास आले. संस्थेतर्फे अपंगांना कृत्रिम अवयव मोफत देण्यात येतात. तसेच दोन फिरत्या मेडिकल सेंटरद्वारा खेडोपाडी जाऊन रुग्णांची मोफत तपासणी केली जाते.


कंजूष नाही तर दानशूर!
आपल्याकडे काहीजण कंजूष मारवाडी, चिक्कू मारवाडी असे गमतीने म्हणतात; परंतु हा समाज आता तसा राहिलेला नाही; कारण या समाजातील अलिखित नियमांनुसार प्रत्येकजण त्यांच्या उत्पन्नातील काही ठरावीक हिस्सा हा गोरगरीब समाज, मुक्या जनावरांसाठी खर्च करतो. परोपकारी वृत्ती हा या समाजाचा स्थायिभाव बनला आहे. पांजरपोळ येथील मुक्या आणि मोकाट जनावरांना या समाजाकडूनच चारा पुरविला जातो.

Web Title: 'Marwadi' ahead of social work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.