‘पणन’, कर्मचाऱ्यांची देणी थांबवून ठेवपावत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST2021-06-01T04:17:47+5:302021-06-01T04:17:47+5:30

(बाजार समिती लोगो वापरावा) कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशासाठी हेलपाटे मारावे लागत ...

‘Marketing’, stopping employee debts | ‘पणन’, कर्मचाऱ्यांची देणी थांबवून ठेवपावत्या

‘पणन’, कर्मचाऱ्यांची देणी थांबवून ठेवपावत्या

(बाजार समिती लोगो वापरावा)

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. पणन मंडळाची अंशदानची रक्कमही अद्याप दिलेली नाही. हे पैसे थांबवून समितीच्या नावे ठेवपावत्या करण्याचा सपाटा अशासकीय मंडळाने लावला असून, नेत्यांसमोर काटकसरीचा कारभार दाखवण्याचा प्रयत्न असला, तरी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

आयुष्यभराच्या सेवेनंतर जमा झालेली पुंजी निवृत्तीनंतर लगेच मिळावी, अशी प्रत्येक कर्मचाऱ्याची अपेक्षा असते. या पैशावर उर्वरित आयुष्याचे नियोजन केलेले असते. त्यामुळे या रकमा प्राधान्याने देणे गरजेचे असते. कोल्हापूर बाजार समितीमध्ये कर्मचारी सेवानिवृत्त होऊन सहा महिने झाले, तरी त्याची देय रक्कम वेळेत दिली जात नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. समितीचे उत्पन्नही चांगले आहे, समितीकडे पैसे शिल्लक असताना कर्मचाऱ्यांचे पैसे थांबवले जातात.

बाजार समितीच्या एकूण उत्पन्नावर ५ टक्के ‘पणन अंशदान’ म्हणून पणन मंडळाकडे दर वर्षी जमा करावे लागते. साधारणता ही रक्कम ७० लाख रुपये होते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर, साधारणता दोन महिन्यांत हे पैसे वर्ग करावेत, असा पणनचा प्रयत्न असतो. मात्र, कोल्हापूर बाजार समितीने मार्चचे ‘अंशदान’ जानेवारीपर्यंत भरण्याची मुभा घेतली होती. यावेळेला मात्र मार्च २०१९-२० चे ‘अंशदान’ अद्याप भरलेले नाही. जवळपास ४५ लाख रुपये देय रक्कम आहे.

काटकसरीच्या नावाखाली कर्मचारी व शासकीय देणी थांबवून समितीच्या नावे ठेवपावत्या करणे कितपत योग्य आहे? सहा महिन्यांत आठ कोटींच्या ठेवी ठेवल्याचे अशासकीय मंडळाचे सदस्य सांगत असले, तरी ही देणी थांबवून ठेवी ठेवल्या हेही नाकारता येत नाही.

कोट-

सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांची देय रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाते, सध्या एका कर्मचाऱ्याची ग्रॅज्युटीची रक्कम देय आहे. त्याचबरोबर पणनचे अंशदान रक्कमही टप्प्याटप्प्याने देत आहे.

- जयवंत पाटील (सचिव, बाजार समिती)

Web Title: ‘Marketing’, stopping employee debts