‘झेंडू’-‘भेंडी’ मिश्र शेतीतून रोगावर मात

By Admin | Updated: January 12, 2016 00:44 IST2016-01-12T00:11:57+5:302016-01-12T00:44:17+5:30

नांगनूरच्या शेतकऱ्याचा प्रयोग : प्लास्टिक मल्चिंग रेजबेडचा वापर; लाखोंचा फायदा

'Marigold' - 'Bhendi' mixed with mixed farming | ‘झेंडू’-‘भेंडी’ मिश्र शेतीतून रोगावर मात

‘झेंडू’-‘भेंडी’ मिश्र शेतीतून रोगावर मात

नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील तरुण पदवीधर प्रगतशील शेतकरी राघवेंद्र सुबराव मोकाशी यांनी झेंडू आणि भेंडी यांची मिश्र पीक शेती करून युवकांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. व्यापारी पद्धतीने शेती केल्यास अपुरा पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे पडणाऱ्या रोगावर मात करून अपेक्षित उत्पन्न मिळविता येते हेच दाखवून दिले आहे.
त्यांनी प्लास्टिक मल्चिंग रेजबेडचा वापर करून दोन फूट अंतरावरती झिगजॅग पद्धतीने झेंडू आणि भेंडी या मिश्र पिकांची ६० गुंठे क्षेत्रावर लागवड केली आहे. भेंडी आणि झेंडू यांच्या दोन सरीतील आंतर पाच फूट ठेवले आहे. झेंडूची रोपे ट्रेमध्ये तयार केली. ३५ दिवसांनंतर रेजबेडवर रोपांची लावणी केली. ड्रीपमधून विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या. त्यांनी १२:६१:००, १३:४०:१३ व ००.००.५० या खतांचा वापर केला. गरजेनुसार आठवड्यातून एकदा औषध फवारणी केली. २५ नोेव्हेंबरपासून फूल तोडणी सुरू केली. आतापर्यंत बियाणे, खते, औषध फवारणीसाठी ३० हजार रुपये खर्च आला आहे. झेंडू फुले विक्रीतून एक लाख रुपये मिळाले असून, झेंडूचा हंगाम किमान आणखी एक महिना चालेल. सध्या ४० क्विंटल फुलांची विक्री झाली आहे.
झेंडू शेजारच्या रेजबेडवर भेंडीच्या बियाणाची १६ आॅक्टोबरला टोकण केले. १ डिसेंबरपासून भेंडी काढणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ७५० किलो भेंडी मिळाली आहे. आठवड्यातून तीनवेळा भेंडीची तोडणी करावी लागते. भेंडीचे उत्पादन अजून दोन महिने मिळू शकेल. प्राथमिक अवस्थेत त्यांना भेंडीपासून २० हजार उत्पन्न मिळाले आहे. झेंडूचा भाव स्थिर नसतो त्यामुळे भेंडीचे मिश्र पीक घेतले आहे. झेंडूने शेतातील वातावरण चांगले राहते व बुरशी सूत्रक्रुमीचा नायनाट होतो. त्याचा फायदा भेंडीला होतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यापारी पद्धतीने केल्यास शेतीतून अपेक्षित उत्पन्न घेता येते, असे मोकाशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.


हरितक्रांतीमध्ये कृषी संस्थांचा सहभाग
भारतातील हरितक्रांतीमध्ये अन्नधान्याच्या वाढत्या उत्पादनाबरोबरच त्याच्या जोडीला दुग्ध उत्पादनामध्येही दखल घेण्याइतकी मजल मारली. यामध्ये केंद्र, राज्य सरकारने स्थापन केलेल्या कृषी संशोधन, प्रशिक्षण संस्था यांचे फार मोठे योगदान आहे. जगाच्या बरोबरीने किंबहुना एक पाऊल पुढे टाकण्यासाठी या संस्था मैलाच्या दगड ठरल्या आहेत. खास शेतकऱ्यांसाठी या संस्थांचा परिचय या आठवड्यापासून...

भारताने औद्योगिकीरणाच्या पातळीवर चांगली प्रगती केली असली तरी त्याचा पाया हा इथल्या शेतीवरच आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू इथल्या शेतीवर परिणाम करतात. या ऋतूनुसारच पिकांची निवड, क्रमवारी, जाती, उत्पादनाची क्षमता ठरते. एकाच वेळी वेगवेगळे वातावरण असणाऱ्या या देशात हरित क्रांती झाल्यानंतर पारंपरिक शेती मागे पडली आणि त्यात आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे, खते, औषधांचा वापर होऊ लागला. लोकसंख्या वाढली तरी आपल्याला पुरवून निर्यात करता येईल इतके अन्न धान्य, फळे आपण पिकवू शकलो.
कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्यात राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणीचे मराठवाडा कृषी विद्यापीठ, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अशी चार कृषी विद्यापीठे आहेत. या चारही विद्यापीठांमध्ये संशोधनबरोबरच पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकवितात. या चारही विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्याचे काम महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद करीत असते.

Web Title: 'Marigold' - 'Bhendi' mixed with mixed farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.