Marathi Official Language Day Special: Meeting of students with 'Maimarthi' | मराठी राजभाषा दिन विशेष : विद्यार्थ्यांच्या भेटीतून ‘मायमराठी’चा जागर

मराठी राजभाषा दिन विशेष : विद्यार्थ्यांच्या भेटीतून ‘मायमराठी’चा जागर

ठळक मुद्देमराठी राजभाषा दिन विशेष : विद्यार्थ्यांच्या भेटीतून ‘मायमराठी’चा जागरशिवाजी विद्यापीठातील उपक्रम

संतोष मिठारी

कोल्हापूर : नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक म्हणून इंग्रजी, तर अधिकची पात्रता म्हणून विदेशी भाषा शिकण्याकडील कल सध्या वाढत आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषेबाबतची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये कायम राहावी, यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे ‘विद्यार्थी विभागाच्या भेटीला’ उपक्रम राबविला जात आहे. त्यातून ‘मायमराठी’चा जागर करण्यात येत आहे.

विद्यापीठ संलग्नित कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील २९१ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येतो. मराठी विभागात दर महिन्याला असणाऱ्या चर्चासत्र, व्याख्याने, परिसंवाद, आदी कार्यक्रमांवेळी दोन ते तीन महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना निमंत्रित केले जाते. त्यांना मराठी भाषेचा इतिहास, तिचे महत्त्व, त्यातील साहित्य, विभागातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, अभ्यासक्रम, मराठी भाषा क्षेत्रातील रोजगार आणि उच्च शिक्षणाच्या संधींची माहिती दिली जाते.

मराठी भाषेच्या प्रसारातील त्यांच्या नवकल्पना, संकल्पना जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यात येतो. वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालय, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र (ग्रंथालय) त्यांना दाखविण्यात येते. दि. १ ते १५ जानेवारीदरम्यान साजरा केला जाणाऱ्या मराठी भाषा संवर्धन पंधरावडा उपक्रमाअंतर्गत बोलीभाषा संकलन, प्रमाण मराठी लेखन, नवोदित लेखक मार्गदर्शन, कथा व कविता लेखन कार्यशाळा, विद्यार्थी लेखक संवाद, कविसंमेलन, युनिकोड आणि विकिपीडिया कार्यशाळा घेतली जाते.

दरवर्षी २०० विद्यार्थ्यांना संगणकावर मराठीचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. गेल्या तीन वर्षांमध्ये या उपक्रमांमध्ये सहा हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ‘मायमराठी’चा जागर करण्याचा मराठी विभागाचा हा उपक्रम आदर्शवत ठरणारा आहे.

उपक्रमाची व्याप्ती वाढविणार

मराठी विभाग हा भाषा, साहित्यसंबंधी विविध उपक्रम राबवीत आहे. मुख्यत: मराठी भाषा संवर्धनासाठी विद्यार्थी आणि समाजकेंद्री उपक्रमांचे नियमितपणे आयोजित केले जातात. ‘विद्यार्थी विभागाच्या भेटीला’ उपक्रमातून मराठी भाषेचा प्रसार, प्रचार केला जात आहे. शाळा, समाजाच्या पातळीवर या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी बुधवारी सांगितले.


गेल्या काही दशकांमध्ये बृहन्महाराष्ट्रातील मराठीची वाटचाल खुंटते आहे. महाराष्ट्राबाहेर तिचा कोंडमारा सुरू आहे. ते थांबविण्यासाठी शासनाने कृतिशील कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. मराठी अनेक बोलींना सामावून घेणारी भाषा आहे. त्यामुळे तिच्या बोलींचाही शास्त्रशुद्ध अभ्यास व्हावा.
- डॉ. नंदकुमार मोरे

 

मराठी विभाग दृष्टिक्षेपात

  • विभागाची स्थापना : १९७९
  •  पदव्युत्तर अभ्यासक्रमांची संख्या : १९
  •  आतापर्यंतच्या पीएच.डी.धारकांची संख्या : २००
  • एम. फिल.धारकांची संख्या : १७५
  • मराठी विकिपीडियावर विभागाने अद्ययावत केलेल्या नोंदी : १००
  • विभागाअंतर्गत कार्यरत अध्यासने : संत तुकाराम, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, अण्णा भाऊ साठे अध्यासन

 

 

Web Title: Marathi Official Language Day Special: Meeting of students with 'Maimarthi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.