किल्ल्यांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 03:35 IST2025-05-12T03:35:07+5:302025-05-12T03:35:24+5:30
करवीर निवासिनी अंबाबाई आणि ऐतिहासिक पन्हाळगडासह राज्यातील इतर सांस्कृतिक आणि तीर्थस्थानांचे दर्शन या योजनेत पाहायला मिळणार आहेत.

किल्ल्यांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : भारतीय रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी ९ जूनपासून सुरू होत आहे. करवीर निवासिनी अंबाबाई आणि ऐतिहासिक पन्हाळगडासह राज्यातील इतर सांस्कृतिक आणि तीर्थस्थानांचे दर्शन या योजनेत पाहायला मिळणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेतून प्रवाशांना त्यांच्या आयुष्याशी निगडित जन्मस्थळ, निवासस्थान, राज्याभिषेक तसेच विजयी मोहिमांशी संबंधित किल्ल्यांवर प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळणार आहे. या अनोख्या प्रवासात पर्यटकांना विशेष यात्रा पॅकेज मिळणार आहे. ‘आईआरसीटीसी’द्वारा संचालित भारत गौरव टुरिस्ट ट्रेन ही विशेष मराठा पर्यटन उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज सर्किटसह मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा लाभ देशभरातील रेल्वे प्रवाशांना घेता येणार आहे.
किती दिवसांचा प्रवास?
सहा दिवसांच्या प्रवासात विशेष पर्यटन मार्गात रायगड, शिवनेरी, प्रतापगड आणि पन्हाळगडाचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स तसेच दादर आणि ठाणे स्थानकावरून ही रेल्वे ९ जूनला सुटेल. पॅकेज श्रेणीत इकोनॉमी (स्लीपर), कम्फर्ट (एसी तृतीय श्रेणी), सुपिरिअर (एसी द्वितीय श्रेणी) हॉटेलमध्ये मुक्कामाची सुविधा आहे.
या स्थळांचा समावेश
किल्ले रायगड, पुणे परिसरातील लाल महाल, कसबा गणेश मंदिर, शिवसृष्टी, किल्ले शिवनेरी, भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग मंदिर, किल्ले प्रतापगड, कोल्हापूरची अंबाबाई मंदिर आणि किल्ले पन्हाळगड.